कल्याण: उकाडा वाढू लागल्यापासून मध्य रेल्वेच्या बदलापूर, टिटवाळा, कल्याण रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या वातानुकूलित लोकलमध्ये आता वर्दीतील पोलीस, रेल्वे कर्मचारी यांची संख्या वाढू लागली आहे. हे कर्मचारी जागा बळकावून बसत आहेत. त्यामुळे दोन ते अडीच हजार रूपयांचा गारेगार लोकलचा रेल्वे पास काढणाऱ्या प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गारेगार लोकलमधून अनेक व्याधीग्रस्त, रुग्ण प्रवासी प्रवास करत असतात. त्यांना लोकलमध्ये चढल्यानंतर बसण्याची खूप गरज असते. परंतु, अगोदर आसनांंवर पोलीस गणवेशात आणि रेल्वे कर्मचारी ऐटीत लोकलमध्ये बसत असल्याने पासधारक प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. गणवेशात महिला, पुरूष पोलीस प्रवास करत असल्याने प्रवासी नाहक त्यांच्याशी वाद घालत नाहीत. परंतु, डब्यात अने्क रुग्ण प्रवासी उभ्याने प्रवास करत आहेत हे माहिती असुनही मोफत प्रवासाची सुविधा असणारे रेल्वे, पोलीस कर्मचारी आपले आसन सोडण्यास तयार होत नाहीत. या विषयावरून गारेगार लोकलमध्ये प्रवाशांंचे महिला, पुरूष पोलीस कर्मचारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांबरोबर वादाचे प्रसंंग सुरू झाले आहेत. पोलिसाबरोबर वाद घातला तर तो आपणास नाहक गुन्ह्यात अडकवेल या भीतीेने त्यांच्याशी वाद घालण्यास कोणी तयार होत नाही. परंतु, आता काही प्रवासी मात्र याविषयी आक्रमक झाले आहेत.

हेही वाचा : ठाणे: दोन लाख रुपयांच्या लाचेप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह दोघे ताब्यात

हे कर्मचारी एकदा गारेगार लोकलमध्ये आसनावर बसले की मोबाईलमध्ये डोके खुपसून बसतात. आपल्या आजुबाजुला वृध्द, ज्येष्ठ, कमरेला, गळ्याला पट्टा लावलेला रुग्ण उभा आहे. त्याला बसण्यासाठी जागा द्यावी, असा थोडासाही विचार करत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. गारेगार लोकलमध्ये डब्यात जागा खाली असेल तर रेल्वे, पोलीस कर्मचाऱ्यांंनी जरूर बसावे पण आता टोळक्याने पोलीस गारेगार लोकलमधील खिडक्यांंच्या जागा पकडून प्रवास करताना दिसत आहेत. अशीच परिस्थिती रेल्वे कर्मचाऱ्यांची आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यासाठी स्वतंत्र लोकल आहे. त्या लोकलमधून रेल्वे कर्मचाऱ्यांंनी प्रवास करावा, असे प्रवाशांंचे म्हणणे आहे. आता गारेगार लोकलमध्ये तिकीट तपासणीस येत नाहीत, त्यामुळे रेल्वे कर्मचारी, पोलीस यांच्यामधील वाद मिटविण्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही. हा वाद शिगेला पोहचण्यापूर्वीच रेल्वे प्रशासनाने आपल्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आणि गृह विभागाने पोलिसांसाठी प्रवास करतानाच्या घ्यावयाची खबरदारी याविषयी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

हेही वाचा : डोंबिवलीत वडिलांकडून व्यसनी मुलाचा खून

वातानुकूलित लोकल मधून प्रवास करताना प्रवासी दीड ते अडीच हजार रुपयापर्यंत पास काढतात. अशा प्रवाशांना गारेगार लोकलमधील पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गर्दीमुळे बसण्यास मिळत नसेल तर ते अन्यायकारक आहे. पोलीस, रेल्वे कर्मचारी गारेगार लोकल मधून मोफत प्रवास करतात त्यामुळे त्यांनी पास धारक कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य द्यावे.

लता अरगडे (अध्यक्ष, उपनगरीय महिला रेल्वे प्रवासी महासंघ)
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan badlapur titwala ac local passengers suffer due to overcrowd of police and railway employees in coaches css
First published on: 25-04-2024 at 11:52 IST