कल्याण : बँक खात्यात किती रक्कम आहे हे तपासण्यासाठी कल्याणमधील बेतुरकरपाडा भागात राहत असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या एका बँक ग्राहकाने ऑनलाइन माध्यमातून आपल्या मोबाइलवर बँकेचे ॲप स्थापित करण्याचा प्रयत्न केला. उपयोजन स्थापित (डाऊनलोड) होत असतानाच, या ग्राहकाच्या खात्यामधून गेल्या आठवड्यात ६ लाख ९७ हजार रुपये अन्य व्यक्तीच्या खात्यात वळते झाले आहेत. या माध्यमातून आपली फसवणूक झाल्याने ग्राहकाने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

कल्याण पश्चिमेतील बेतुरकरपाडा भागातील एका गृहसंकुलात राहत असलेल्या अमन मोहन पिसे (वय २०) यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अमन यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपल्या वडिलांचे कल्याणमधील बँक ऑफ इंडिया शाखेत खाते आहे. या खात्यातून सर्व व्यवहार वडील करत असतात. ते एका वकिलाच्या कार्यालयात अपघात विम्याची कामे करतात.

गेल्या आठवड्यात वडिलांना आपल्या बँक ऑफ इंडियातील खात्यात किती शिल्लक रक्कम आहे हे तपासायचे होते. यासाठी त्यांनी बँकेत जाऊन विचारणा करण्यापेक्षा बँकेचे ॲप स्थापित करून त्या माध्यमातून आपल्या खात्यामधील रक्कम तपासण्याचा निर्णय घेतला. घरात असताना वडील मोहन पिसे यांनी प्ले स्टोरमध्ये जाऊन बँक ऑफ इंडियाचा लोगो असलेले ॲप आपल्या मोबाइलमध्ये स्थापित करून घेतले. त्या ॲपवर बीओआय मोबाइल असा उल्लेख होता.

ॲप स्थापित होताच मोहन यांच्या बँक खात्यातून एक तासाच्या अवधीत एक लाख ९५ हजार, ९५ हजार, ५३ हजार, २५ हजार अशा एकूण नऊ व्यवहारांमध्ये ६ लाख ९७ हजार रूपये अन्य खात्यात वर्ग झाले. बँकेचे ॲप स्थापित केल्यानंतर कोणतेही व्यवहार केले नाहीत. आपल्या बँक खात्यामधून नऊ व्यवहारात पैसे अज्ञात व्यक्तीच्या खात्यात वळते झाले. त्यामुळे पिसे यांनी तातडीने बँकेच्या ग्राहक सुविधा क्रमांकावर संपर्क साधला. आपल्या बँक खात्यातील व्यवहार काही काळासाठी थांबविण्याची सूचना केली.

पिसे यांनी बँकेत जाऊन बँकेच्या व्यवहाराचे स्टेटमेंट काढले. त्यात नऊ व्यवहारांमध्ये अज्ञाताच्या बँक खात्यावर ६ लाख ९७ हजार वर्ग झाल्याचे आढळले. त्यामुळे बँकेच्या बनावट ॲपच्या माध्यमातून आपल्या वडिलांची फसवणूक अज्ञाताने केल्याने मोहन यांचा मुलगा अमन याने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.