कल्याण : येथील बेतुरकरपाडा परिसरात औषध खरेदीसाठी गेलेल्या एका १७ वर्षाच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे अपहरण केले. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. गेल्या वर्षभरात कल्याण, डोंबिवली परिसरातून ५० हून अधिक बालकांचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
कल्याण पूर्वेतील पिसवली, खडेगोळवली, दावडी या परिसरात लहान मुलांना फूस लावून पळवून नेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कल्याण, डोंबिवलीत दर आठवड्याला दोन अल्पवयीन बालकांचे अपहरण होत आहे. अपहरणामध्ये अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. कल्याण पश्चिमेतील शिशु विकास शाळेजवळील बेतुरकरपाडा येथील भोईर चाळीत राहणाऱ्या कुटुंबातील मुलीचे अपहरण झाले आहे. हे कुटुंब मुळचे मुरबाड तालुक्यातील किसळ गावचे आहे. पाच दिवसांपूर्वी या घरातील आईवडील मूळ गावी गेले होते. त्यावेळी कल्याणमधील घरात त्यांच्या दोन मुली आणि सासु होत्या. यातील एक मुलगी बिर्ला महाविद्यालयात १२ वीच्या कला शाखेत शिक्षण घेते. ती सकाळी अकरा वाजता आपल्या वडिलांना संपर्क करून आपल्या आजीला औषध आणण्यासाठी जात असल्याचे सांगून बाहेर गेली. त्यानंतर खूप उशीर होऊनही ती परत आली नाही. तिच्या बहिणीने परिसरात शोध घेतला. वडिलांनी मुरबाडहून तिला संपर्क केला असता तिचा मोबाइल व्यस्त होता. वडिलांनह परतल्यावर मुलीच्या मैत्रिणी, नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली.
मुलगी कोठेही सापडली नसल्याने वडिलांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. काही महिन्यांपासून कल्याण-डोंबिवली परिसरात अल्पवयीन मुली पळवून देणारी टोळी सक्रिय असल्याची चर्चा आहे. गेल्या महिन्यात अल्पवयीन मुलींना पळवून नेणाऱ्या काही चोरांना पोलिसांनी पकडले होते.
