Kalyan RTO action on Gandhare bridge: भिवंडी मार्गावरील गांधारे पूल येथे मध्यरात्रीच्या सुमारास कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि वायुवेग पथकाने अचानक तपासणी मोहीम राबवून भरधाव वेगात वाहने चालविणाऱ्या, मद्य सेवन करून दुचाकी चालविणाऱ्या, काळ्या काचा लावून वाहने फिरवणाऱ्या अशा एकूण ३० वाहन चालकांवर कारवाई केली. अचानक झालेल्या या कारवाईने दुचाकी स्वारांची सर्वाधिक तारांबळ उडाली.
डोंबिवलीतील माणकोली पूल, ठाकुर्लीतील ९० फुटी रस्ता, कल्याण पूर्वेतील १०० फुटी रस्ता, रिजन्सी अनंतम भागातील रस्ता, वाडेघर ते टिटवाळा भागातील बाह्यवळण रस्ता ही दुचाकी स्वार आणि चारचाकी स्वारांची भरधाव वेगाने वाहने चालविण्याची ठिकाणे आहेत. रात्रीच्या वेळेत भरधाव वेगात थरारक कृती करत वाहने चालविणारे वाहन चालक या रस्त्यांवर येऊन जीव धोक्यात घालून वाहने चालवितात. या रस्त्यांवर थरारक पध्दतीने, मद्य सेवन करून, जीव धोक्यात घालून वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांवर स्थानिक पोलिसांनी दंडात्मक आणि फौजदारी कारवाया केल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरील मध्यरात्रीच्या सुमारास मोठा आवाज करत, मद्य सेवन करून वाहने चालविणाऱ्यांची संख्या आता पूर्ण थांबली आहे.
काही दिवसांपासून भरधाव वेगात वाहने चालविणारे, स्पोर्टस बाईकवर थरारक हालचाली करत वाहने चालविणारे, मद्य सेवन करून मोटार, दुचाकी चालविणारे वाहन चालक कल्याण पश्चिमेतील गांधारे पुलावर मध्यरात्रीच्या सुमारास अधिक संख्येने जमतात. स्वताच्या जीवा बरोबर इतर वाहन चालक, सहप्रवासी, समोरून येणाऱ्या वाहन चालकाच्या जीवाची पर्वा न करता पुलावरून भरधाव वेगात वाहने चालवित असल्याच्या तक्रारी कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीप्रमाणे बारकुल यांनी गांधारे पुलावर थरारक कृती करून वाहने चालविणाऱ्या वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
बुधवारी मध्यरात्री उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारकुल यांच्या मार्गदर्शनाखाली वायुवेग पथकाच्या साहाय्याने मोटार वाहन निरीक्षक रोहन जाधव, साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत सूर्यवंशी अचानक गांधारे पुलावर आले. त्यांनी पुलावर दुचाकी, मोटारींच्या साहाय्याने थरारक कृती चालविणाऱ्या वाहन चालकांना पुलावर दोन्ही बाजुने रोखून धरले. त्यामुळे वाहन चालकांची कोंडी झाली. पुलावर थरारक कृती करत वाहने चालविणाऱ्या दुचाकी, मोटार चालकांवर वायुवेग पथकाने कारवाई केली.
त्यानंतर पुलावरून धावणाऱ्या अवजड वाहनांची तपासणी केली. या तपासणीत अनेक मालवाहू वाहन चालकांकडे वाहनाची कागदपत्रे आढळली नाहीत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कल्याण, भिवंडी दिशेने प्रवास करणारे काही वाहनांना काळ्या काचा लावल्या असल्याचे पथकाला दिसले. त्या वाहनांच्या काळा काचा तात्काळ काढुन टाकण्यात आल्या. त्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. काही रिक्षा चालक चार ते पाच प्रवासी घेऊन प्रवास करत होते.ते गणवेशात नव्हते. त्या रिक्षा चालकांकडे वाहनाची कागदपत्रे नव्हती. त्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली. काही अल्पवयीन मुले दुचाकी चालवित असल्याची या कारवाईच्यावेळी आढळून आली. त्यांच्या पालकांना घटनास्थळी बोलावून समज देण्यात आली, असे बारकुल यांनी सांगितले.
रात्रीच्या वेळेत रस्त्यांवरील वाहतूक कमी झाली की हौशी वाहन चालक भरधाव वाहनांचा थरार करण्यासाठी आपली दुचाकी, मोटार घेऊन शहराबाहेरील रस्त्यांवर भरधाव वेगात, मद्यसेवन करून वाहने चालवितात. यामध्ये स्वताबरोबर दुसऱ्याचा जीव हे वाहन चालक धोक्यात घालतात. त्यामुळे अशा वाहन चालकांवर कल्याण आरटीओकडून नियमित रात्रीच्या वेळेत कारवाई केली जाणार आहे. आशुतोष बारकुल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.
