कल्याण : भिवंडी परिसरातील एका कंपनीत नोकरी करत असलेली महिला गुरुवारी सायंकाळी सहा वाजता मुंबईतील घरी परतण्यासाठी भिवंडी रेल्वे स्थानकात आली होती. रेल्वेगाडीची वाट पाहत असताना अचानक एका व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी व अन्य दागिने हिसकावून पळ काढला. महिलेने आरडाओरड करताच फलाटावरील प्रवाशांनी पाठलाग करून चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
गुड्डुकुमार लाल बाबुप्रसाद (वय३०) असे आरोपीचे नाव आहे. तो पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील डाकिवली गावचा रहिवासी आहे. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्चना बारटक्के असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्या घाटकोपर येथे राहतात. त्या भिवंडी येथील क्रिस्टल कंपनीत काम करतात. त्या कोपर रेल्वे स्थानकातून घाटकोपरचा प्रवास करतात. गुरुवारी त्या कंपनीतून निघाल्यानंतर नेहमीप्रमाणे भिवंडी रेल्वे स्थानकात आल्या. त्या कोपर दिशेने जाणाऱ्या वसई-पनवेल रेल्वेगाडीची वाट पाहत बाकावर बसल्या असताना अचानक त्यांच्या मागून येऊन एकाने अर्चना यांच्या मानेवर जोरााचा फटका मारून त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावून पळ काढला.
गळ्यातील सोन्याची साखळी, सोन्याचे पान चोरट्याने हिसकावल्याचे लक्षात येताच, त्यांनी आरडाओरड करीत चोरट्याचा पाठलाग केला. त्यासरशी फलाटावरील इतर प्रवाशांनाही चोरट्याला पकडण्यासाठी धाव घेतली. प्रवाशांनी चारही बाजुने चोरट्याला घेरले व त्याला पकडून चोप दिला. त्याच्याकडील चोरलेला सोन्याचा ऐवज ताब्यात घेऊन तो अर्चना बारटक्के यांच्या ताब्यात दिला. फलाटावर एकदम ओरडा झाल्याने गस्तीवरील लोहमार्ग पोलीस तेथे आले. प्रवाशांनी चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीने काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास लोहमार्ग पोलीस करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
