कल्याण – गेल्या काही महिन्यांपासून कल्याण शहराच्या विविध भागात सार्वजनिक रस्त्यांवरून, घरासमोरून, बाजारपेठेतून मोटार सायकल चोरणाऱ्या कल्याण शहरातीलत चार चोरट्यांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दुचाकी स्वारांच्या चोरलेल्या सात दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या चोरट्यांनी आणखी काही दुचाकी चोरल्या आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.

समर्थ नरसू पाटील (१९, साई रचना सोसायटी, न्यू मनीषानगर, बेतुरकरपाडा, कल्याण), हर्ष रमेश परदेशी (२१, रा. कृष्णा काॅलनी, बेतुरकरपाडा, कल्याण), प्रणित दिनेश शितप (२१, रा. मढवी चाळ, शिवनगर, सापर्डेगाव, कल्याण), रंगनाथ उर्फ सागर सुखदेव ढवळे (१८, रा. दळवी चाळ, वाडेघर, कल्याण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कल्याण शहराच्या विविध भागात मोटार सायकल चोरण्याचे प्रमाण मागील काही महिन्यांपासून वाढले होते. असे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल होण्याचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे बाजारपेठ पोलीस या प्रकरणातील चोरट्यांच्या मागावर होते.

बाजारपेठ पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे आणि गुन्हे शोध पथकाचे हवालदार यांना गुप्त माहिती मिळाली की कल्याण शहरात मोटार सायकल चोरणारा एक चोरटा समर्थ नरसू पाटील हा बेतुरकरपाडा साई रचना सोसायटी येथे एका दुचाकीसह उभा आहे. ही माहिती समजताच आणि या माहितीची पक्की खात्री पटल्यावर बाजारपेठ पोलिसांचे पथक तातडीने बेतुरकरपाड्यात पोहचले. चोरटा समर्थ पाटील याला पळून न जाण्याची संधी न देता त्याला जागीच ताब्यात घेतले. त्याच्या अटकेनंतर त्याची कसून चौकशी केल्यावर पोलिसांना त्याने आपल्या उर्वरित तीन साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी त्यांनाही अटक केली.

या चार चोरट्यांनी कल्याण शहर परिसरातील बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत पाच, महात्मा फुले पोलीस ठाणे हद्द आणि खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येक एक अशा एकूण सात दुचाकी चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. मागील एक महिन्यापासून आम्ही या दुचाकी सार्वजनिक रस्ते, इमारतींसमोरून चोरून नेत होतो, असेही त्यांनी पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी या चोरट्यांकडून चोरलेल्या चोरीच्या सातही दुचाकी हस्तगत केल्या. या दुचाकींची किंमत दोन लाख ८० हजार रूपये आहे. या चोरट्यांची चौकशी करायची असल्याने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

या चोरी प्रकरणात पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्या पुढाकाराने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड, पोलीस निरीक्षक डुकळे, शोध पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे, हवालदार पाटील, भालेराव, बी. आर. बागुल, पी. एम. बावीस्कर, ए. बी. आंधळे, आर. ए. ईशी यांनीही अटकेची कामगिरी पार पाडली.