कल्याण – कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत बिर्ला स्कूलच्या निलराज घुणकीकर याने शाळेचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच या चुरशीच्या लढतीत त्याने सुवर्णपदक प्राप्त केले.कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थी या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्यातील क्रीडागुणांना वाव मिळावा, खिलाडूवृत्ती विकसित व्हावी आणि खेळाच्या माध्यमातून आत्मविश्वास व जिद्द वाढावी, त्यांना आपले क्रीडागुण दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
मागील अनेक वर्ष या स्पर्धा भरविण्यात येतात. या स्पर्धेत निलराज घुणकीकर याने आपल्या कौशल्यपूर्ण खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना मात देत प्रथम क्रमांक मिळवला. त्याच्या जिद्दीचे, मेहनतीचे आणि उत्कृष्ट क्रीडाकौशल्याचे हे यशस्वी फलित मानले जात आहे. निलराज याने या स्पर्धेत यश मिळविण्यासाठी मागील अनेक महिने आपला सराव चालू ठेवला होता.
कुशल प्रशिक्षक, शाळेतील क्रीडा शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तो किक बाॅक्सिंगमधील खेळ प्रकार शिकत होता. शालेय अभ्यासक्रम करून तो या प्रशिक्षणासाठी सज्ज होत होता. निलराजची ही मेहनत बघून शाळेने त्याला प्रशिक्षणासाठी पुरेसा वेळ दिला होता. शरीर सदृढतेसाठी निलराज नियमित व्यायाम करतो. अभ्यासासाठी पुरेसा वेळ देऊन आपण क्रीडाविषयक या उपक्रमात सहभागी होतो, असे निलराज याने सांगितले. शालेय अभ्यासक्रमात तो हुशार आहे.
निलराजच्या या घवघवीत यशामुळे त्याच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवार, बिर्ला स्कूल शाळा व्यवस्थापन, शिक्षक, शिक्षकेतरी कर्मचारी यांनी समाधान व्यक्त करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय बाॅक्सिंग स्पर्धेत अशाप्रकारचे यश मिळविण्यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहोत, असे निलराज याने सांगितले.
