कल्याण : राज्यातील दुष्काळाच दाह वाढत जाऊन शेतकऱ्यांची विविध माध्यमातून अधिक प्रमाणात होरपळ सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्तांना कल्याण परिसरातून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मदत मिळावी, या उद्देशातून भाजपच्या कल्याण शाखेतर्फे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी १० नोव्हेंबर रोजी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी कल्याण पश्चिमेतील लालचौकी भागातील फडके मैदानावर पहाटे साडे पाच वाजता हा दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने सुरेल संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. भीषण दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा प्रकाश निर्माण व्हावा, या सामाजिक भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. असे भाजपचे नगरसेवक आणि जुने कल्याण भाजप शहराध्यक्ष अमित धाक्रस, नवीन कल्याण भाजप शहराध्यक्ष स्वप्नील काठे यांनी सांगितले.
‘एक सूर माणुसकीच, बळीराजासाठी मदतीचा’ या संकल्पनेतून सुरेल संगीत मैफल आयोजित करण्यात आलीआहे. शेतकऱ्यांच्या कष्टातून आपल्या घरातील चूल पेटते आणि त्यांच्या घामातून आपल्या ताटात अन्न येते. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे आज अनेक शेतकरी भीषण दुष्काळामुळे आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा कठीण परिस्थितीत बळीराजाच्या मदतीसाठी समाजाने एकत्र येण्याची गरज ओळखून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर आणि भाजप नगरसेवक शामल गायकर हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. नगरसेवक तथा जुने कल्याण शहराध्यक्ष अमित धाक्रस आणि नविन कल्याण भाजप शहराध्यक्ष स्वप्निल काठे यांनी निमंत्रक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.
या सुरेल संगीत मैफलीत ज्येष्ठ मराठी गायक हर्षवर्धन वावरे, ज्ञानेश्वर मेश्राम, आनंदी जोशी आणि भाग्यश्री देशपांडे आपल्या सुमधुर गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन दीप्ती भागवत करणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून जमा होणारी मदत धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यामुळे संगीताचा आनंद घेण्यासोबतच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योगदान देण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
या सामाजिक उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच बळीराजाच्या मदतीसाठी सढळ हस्ते देणगी देऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी कल्याणमध्ये अशाप्रकारचा प्रथमच जाहीर कार्यक्रम होत आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
