कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. हे रस्ते गणेशोत्सवाच्या काळात सुस्थितीत करण्यात आले नाहीत. आता नवरात्रोत्सवापूर्वी हे रस्ते सुस्थितीत करावेत, अन्यथा संबंधित पालिका अधिकाऱ्यांना खड्ड्यात गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा कल्याणमधील शिंदे गटाचे शिवसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील यांनी दिला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रुग्णवाहिका चालकांना रुग्णवाहिकेतून नेताना कसरत करावी लागते. याची कोणतीही वेदना पालिका अधिकाऱ्यांना होत नाही याचे आश्चर्य वाटते. गणेशोत्सवापूर्वी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, २७ गावातील रस्त्यांवरील खड्डे भरून सुस्थितीत करण्याचे आश्वासन आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिले होते.

शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनीही या कामांकडे दुर्लक्ष केले. किरकोळ डागडुजी व्यतिरिक्त खड्डे भरण्याची कामे ठेकेदारांनी केली नाहीत. ऑगस्ट महिन्यात २५ दिवस पावसाने उघडिप दिली होती. या कालावधीत खड्डे भरणीची कामे पालिकेने प्राधान्याने करणे आवश्यक होते. या कालावधीत रस्ते बांधकाम अधिकारी निवीदा काढण्याच्या नियोजनात अडकून पडले होते, अशी टीका शहरप्रमुख रवी पाटील यांनी केली. गणेशोत्सवाच्या काळात खड्डे न भरल्याने गणपती खड्ड्यातून आले आणि गेले. आता नवरात्रोत्सवात हा प्रकार सहन केला जाणार नाही. येत्या सात दिवसात पालिकेने रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे पूर्ण करावीत. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना त्याच खड्ड्यात गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा : मराठवाड्याचे मागासलेपण दूर करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांची थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली जाईल. रस्ते खड्डे भरणी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांचे एकही देयक पालिकेने अदा करू नये, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली जाईल, असे पाटील यांनी सांगितले. दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या उत्सवाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून शहरप्रमुख रवी पाटील यांनी दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्रोत्सव नियोजनाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. आयुक्त डाॅ. दांगडे ७ ऑक्टोबरपर्यंत वैद्यकीय रजेवर आहेत. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे पालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. जिल्हाधिकारी शिनगारे यांनीही पालिका हद्दीतील खड्ड्यांविषयी आश्चर्य व्यक्त करुन ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

हेही वाचा : कल्याणमध्ये दुकानात येऊन तीन महिलांनी व्यावसायिकाला लुटले

शहर अभियंता अर्जुन अहिरे यांचा अधिकारी, ठेकेदार यांच्यावर वचक नसल्याने त्याचा गैरफायदा अधिकारी, ठेकेदारांनी घेतला. शहरातील खड्डे कायम राहिल्याची चर्चा आहे. आता अहिरे वैद्यकीय रजेवर गेले आहेत. मागील दोन वर्षात प्रभावीपणे रस्त्यावरील खड्डे भरण्याची, रस्ते सुस्थितीत करणाऱ्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांच्याकडे शहर अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

Story img Loader