कल्याण : सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होईल अशा निष्काळजीपणाने होर्डिंगची उभारणी केल्यामुळे सहजानंद चौकातील होर्डिंग दुर्घटनेतील ठेकेदारावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या दुर्घटनेत ज्या वाहन मालकांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे. जे पादचारी या अपघातात जखमी झाले आहेत. तो सर्व खर्च होर्डिंगच्या ठेकेदाराकडून वसूल केला जाणार आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी शुक्रवारी दिली.

सहजानंद चौकातील होर्डिंगच्या सांगाड्यावर जाहिरात फलक लावण्यासाठी पत्रे लावण्यात आले होते. हे पत्रे शुक्रवारी सकाळी रस्त्यावर कोसळले. त्यामुळे दोन वाहने, दोन पादचारी या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. होर्डिंग हे सार्वजनिक ठिकाणी असल्याने ते काळजीपूर्वक लावणे आवश्यक होते. या होर्डिंगबाबत निष्काळजीपणा दिसून आला आहे. त्यामुळे या निष्काळजीपणाला संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरून त्याच्यावर भरपाईची, फौजदारी कारवाई केली जाणार आहे, असे आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले.

हेही वाचा…डोंबिवलीतील बेकायदा राधाई कॉम्प्लेक्सवर हातोडा, दोन दिवसात इमारत भुईसपाट करण्याचे नियोजन

सहजानंद चौकातील दुर्घटनेनंतर आयुक्त डॉ. जाखड यांनी पालिकेच्या दहा प्रभाग हद्दीतील होर्डिंगचे सांगाडे, त्यावरील पत्रे किंवा व्यवस्था सुस्थितीत आहे की नाही यासंदर्भात पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश साहाय्यक आयुक्तांना दिले. पालिका हद्दीत अनेक भागात राजकीय आशीर्वादाने बेकायदा फलक, त्यांचे लोखंडी सांगाडे उभे आहेत. त्या फलकांची माहिती घेऊन ते फलक आणि त्यांचे अनेक वर्षापासूनचे सांगाडे तोडून टाकण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेण्याची मागणी जाहिरात फलक संदर्भातील काही व्यावसायिकांकडून केली जात आहेत. बेकायदा फलकांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली पालिकेला एक पैशाचाही महसूल मिळत नसल्याचे या बेकायदा फलकांच्या विरुध्द पालिकेत तक्रारी करणारे माहिती कार्यकर्ते सुरेश तेलवणे यांनी सांगितले.