Ramesh Mhatre disqualification demand over his son’s illegal building in Dombivli: शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांच्या मुलाने प्रभागातील जुनी डोंबिवली भागात एक बेकायदा इमारत उभारली आहे. या इमारतीला पालिकेच्या बांधकाम परवानग्या नाहीत. पालिकेच्या ह प्रभागाने ही इमारत अनधिकृत घोषित केली आहे. रक्ताच्या नात्यामधील कोणीही बेकायदा बांधकाम केले असेल तर संबंधित नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द होते. त्यामुळे नगरसेवक म्हात्रे यांच्या मुलाने केलेल्या बेकायदा बांधकामांशी रक्ताच्या नात्याने रमेश म्हात्रेंचा थेट संबंध येत आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद तात्काळ रद्द करा, अशी तक्रार तक्रारदार कल्पेश गंगाराम जोशी यांनी राज्याचे निवडणूक आयुक्त, नगरविकास प्रधान सचिव, कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे गेल्या सहा महिन्यापूर्वी केली आहे.
या तक्रारीच्या प्रती कोकण विभागीय आयुक्त, ठाणे जिल्हाधिकरी, कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त यांना देऊनही या गंभीर तक्रारीविषयी शासन दखल घेत नाही. यामागे राजकीय दबाव हेच मुख्य कारण आहे, असे तक्रारदार कल्पेश जोशी यांनी सांगितले. गेल्या सात महिन्यापूर्वी झालेल्या कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्यावेळी नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी पालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना सत्यप्रतिज्ञा पत्रावर मी, माझ्यावरील अवलंबित्व (पत्नी, मुले)यांनी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम केलेले नाही असे लिहून दिले आहे. अशाप्रकारचे अनधिकृत बांधकाम केल्याचे सिध्द झाल्यास मी नगरसेवक राहण्यास अपात्र ठरेन याची मला जाणीव आहे, असे म्हटले आहे. रमेश म्हात्रेंवरील अवलिंबत्व असलेल्या त्यांच्या मुलाने अनधिकृत बांधकाम केले असल्याचे सिध्द झाल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे, अशी तक्रारदाराची मागणी आहे.
या मागणीसाठी पालिका आयुक्त ते ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांकडे पाठपुरावा करूनही त्यांनी रमेश म्हात्रेंच्या आक्रमक स्वभावामुळे त्यांच्या मुलाच्या बेकायदा इमारतींवर कारवाई केली नाही. तसेच म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचे तक्रारदाराने सांगितले.
बेकायदा इमारत प्रकरण
कल्याण महसूल विभागातील डोंबिवलीतील जुनी डोंबिवली भूमापन क्रमांक उपविभाग २६-१५, २६-१६-अ या भूखंडावर आरव हाईट्स नावाची पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता सात माळ्याची बेकायदा इमारत उभारण्यात आली आहे. जानेवारी २०१७ मध्ये ही बेकायदा इमारत पालिकेच्या ह प्रभागाने अनधिकृत घोषित केली आहे. भूमाफियांशी सलगी करून, तसेच राजकीय दबावामुळे पालिका अधिकाऱ्यांनी ही इमारत जमीनदोस्त केली नाही. सह दुय्यम निबंधक कार्यालय, कल्याण ४ कार्यालयात या बेकायदा इमारतीचे विकसन करार, कुलमुखत्यार दस्तऐवज ३५८३-२०१६ या क्रमांकाने नियमबाह्यपणे नोंदविण्यात आले आहेत.
या इमारत उभारणी केलेल्या भूखंडाशी रमेश म्हात्रे यांचा मुलगा प्रवीण म्हात्रे, राजेंद्र पंढरीनाथ शेरेकर यांचा संबंध नसताना, या भूखंडाच्या सातबारा उताऱ्यावर बनावट पध्दतीने प्रवीण रमेश म्हात्रे, शेरेकर यांची नावे घुसविण्यात आली आहेत. हे बनावट सातबारा उतारे दस्त नोंदणीसाठी वापरण्यात आले आहेत. बेकायदा इमारत उभारून त्याची बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी प्रवीण रमेश म्हात्रे आणि इतरांवर विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा (गुन्हा क्र. ०२६२-२०२५) दाखल आहे.
नगरसेवक पद अडचणीत
प्रवीण रमेश म्हात्रे हे रमेश सुकऱ्या म्हात्रे यांचे अवलंबित्व आहेत. हे म्हात्रे कुटुंब डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागातील राजाई टाॅवरमध्ये एकत्रित पध्दतीने राहत आहे. त्यामुळे मुलाच्या बेकायदा कृत्यामुळे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी उमेदवारी अर्जात सत्यप्रतिज्ञापत्राद्वारे दिलेल्या हमीचा भंग झाला आहे. त्यांचे नगरसेवक पद राज्य निवडणूक आयोगाच्या नियमाने तात्काळ रद्द करावे, अशी मागणी तक्रारदार जोशी यांनी केली आहे.
राजकीय दबावामुळे आपल्या अर्जावर शासन, पालिकास्तरावर कारवाई होत नाही. याप्रकरणात शासन, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी लक्ष घालून म्हात्रे यांचे नगरसेवक पद करण्यासाठी आणि आपणास न्याय देण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे.
