कल्याण: कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टरांना मारहाण करणाऱ्या मुजोर नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना शुक्रवारी दुपारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात विष्णुनगर पोलिसांनी तगड्या बंदोबस्तात हजर केले. यावेळी जिल्हा न्यायालयाचे न्यायाधिश के. एच. कातकडे यांनी रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अनेक वर्षानंतर प्रथमच मारहाणप्रकरणी एक नगरसेवकाला पोलीस कोठडीत जावे लागले आहे.
म्हात्रें यांच्या बरोबर त्यांचे मारहाणीतील तीन साथीदार रमेश लक्ष्मण पवार, प्रमोद उर्फ प्रकाश उध्दव निकम, अक्षय शरद कारंडे यांनाही न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या तीन आरोपींची कोठडीची मुदत संपल्याने त्यांनाही न्यायालयात पोलिसांनी हजर केले होते. न्यायालयाने त्यांनाही पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
यावेळी न्यायालयाने रमेश म्हात्रे यांचे वय आणि त्यांना एकच मूत्रपिंड असल्याने त्यांच्या शारीरिक व्याधीचा विचार करून त्यांना काही कोठडीत त्रास होत असेल तर त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचार देण्याची सूचना पोलिसांना केली. रमेश म्हात्रे यांना बुधवारी दुपारी अटक केल्यानंतर त्यांना उच्चरक्तदाबाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांच्यावर कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रुग्णालयात उपचार न करता त्यांना ठाणे येथील सिव्हील रुग्णालयात राजकीय दबावातून उपचारासाठी नेण्यात आले.
तेथे प्राथमिक तपासणीनंतर त्यांना तेथून सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. पण राजकीय चक्र फिरली. आणि म्हात्रे यांचा सिव्हील रुग्णालयातील मुक्काम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हात्रे यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी गुरूवारी त्यांना कल्याण न्यायालयात हजर करण्याची तयारी केली. परंतु, त्यांचा आजार बघता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले नाही.
म्हात्रेंच्या वकिलांनी म्हात्रे यांच्या आजार व्याधीची माहिती न्यायालयाला देऊन दूरदृश्यप्रणालीद्वारे सुनावणी घेण्याची मागणी केली. पोलिसांनी आरोपी रुग्णालयात दाखल असल्याने नवीन कायद्यानुसार पोलीस अटक आरोपीच्या पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेऊन न्यायालयीन कोठडीची मागणी केली. यावेळी न्यायालयाने बचाव पक्ष आणि पोलिसांना आपण पहिले आरोपीला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करा, त्यानंतर आपण आपले म्हणणे ऐकून घेऊ असे सांगितले.
म्हात्रेंच्या वतीने ॲड. अजित पत्की, सरकार पक्षातर्फे सी. व्ही. बावस्कर, ए. पी. आडसकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्याप्रमाणे शुक्रवारी दुपारी म्हात्रे यांना दुपारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने रमेश म्हात्रेंचे वकील यांची बाजू ऐकून घेतली. म्हात्रेंचे आजारपण, त्यांच्या व्याधींची माहिती न्यायालयाला दिली. त्यांना कोठडीची गरज नसल्याचे सांगितले. पोलिसांच्या वतीने पोलीस अभियोक्त्याने रमेश म्हात्रे यांची चौकशी करण्यासाठी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. त्याला प्रतिवादी पक्षाने हरकत घेऊन कोठडीची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाला सांगितले.
न्यायालयाने दोन्ही बाजुचे म्हणण ऐकून रमेश म्हात्रेंना सोमवार (ता.१३) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यावेळी न्यायालयाने कोठडीत असताना म्हात्रे यांना काही शारीरिक त्रास झाला तर त्या आजाराप्रमाणे अत्यावश्यक वैद्यकीय उपचार तातडीने देण्याचे पोलिसांना सूचवले.
मागील ३० वर्षाच्या काळात पालिकेत नगरसेवक राहिलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी अनेकांशी दांडगाई केली. त्यांच्या तापट स्वभावामुळे कधी कोणी त्यांच्याशी पंगा घेतला नाही. आपणास लोक घाबरतात, अशी त्यांची दाट समज होती. अखेर डाॅक्टर मारहाण प्रकरणात ते चांगलेच अडचणीत आले. मागील अनेक वर्षाचा हिशेब त्यांच्या अटकेने पूर्ण झाला, अशी चर्चा आता कल्याण परिसरात सुरू आहे. आता त्यांचे नगरसेवक पद शासनाने तातडीने रद्द करावे, अशी डाॅक्टर, वैद्यकीय ंघटना, नागरिक, परिचारिकांची मागणी आहे.
