कल्याण – पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डाॅक्टरांना बेदम मारहाण करणारा आणि परिचारिकांना अरेरावी करणारा आणि मागील महिनाभरापासून महाराष्ट्रातून हद्दपार असलेला शिंदे शिवसेनेचा डोंबिवलीतील कोपर प्रभागाचा नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे याच्या विरूध्द बुधवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून या गुन्ह्याचा तपास विष्णुनगर पोलिसांकडून काढुन घेऊन तो कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
मागील दोन महिन्यांपासून उपायुक्त झेंडे या गुन्ह्याशी संबंधित शास्त्रीनगर रुग्णालयातील साक्षीदार डाॅक्टर, परिचारिका, कर्मचारी, सीसीटीव्हीशी संबंधित ठेकेदार यांच्या साक्षी, पुरावे गोळा करण्याचे काम समर्पित भावाने करत होते. फोरेन्सिक तज्ज्ञांकडून मिळालेली सीसीटीव्ही चित्रणाचे सत्यापन आणि तज्ज्ञांच्या अहवालाची सत्यता याविषयी रात्रंदिवस काम करत होते.
न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मागील महिनाभराच्या कालावधीत उपायुक्त झेंडे यांनी सर्व प्रकारचे साक्षी, पुरावे, फोरेन्सिक तज्ज्ञांचे अहवाल तयार करून, त्यांचे सत्यापन करून दोषारोपत्र तयार केले. हे दोषारोपपत्र बुधवारी कल्याण न्यायालयात दाखल करण्यात आले.
उच्च न्यायालय दखल
डाॅक्टरांना मारहाण करूनही कल्याण न्यायालयातून जामीन मिळविण्यात यशस्वी झालेल्या रमेश म्हात्रेच्या जामिनीचा मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत गेल्या महिन्यात स्वताहून याचिका दाखल करून घेतली. रमेश म्हात्रेला झटपट जामीन मिळाल्याने भारतीय वैद्यकीय संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त करत महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. हा हल्ला म्हणजे वैद्यकीय व्यस्थेवरील हल्ला, असे मत व्यक्त करत उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती गौतम अंखड यांनी रमेश म्हात्रेचा जामीन रद्द केला होता.
रमेश म्हात्रेला २४ तासात पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिले. रमेश स्वताहून विष्णुनगर पोलिसांना शरण आला होता. त्याची रवानगी आधारवाडी तुरूंगात पोलिसांकडून करण्यात आली होती. तो २० दिवस आधारवाडी तुरूंगात होता. डाॅक्टरांना मारहाण केल्यानंतर आधारवाडी तुरूंगात जाण्यास लागू नये म्हणून रमेश म्हात्रेने शक्कल लढवत वैद्यकीय कारणे देऊन ठाण्यात सिव्हील रुग्णालयात उपचार घेणे पसंत केले होते.
रमेश म्हात्रे हद्दपार
२० दिवसातील तुरूंगातील वास्तव्याने त्रस्त रमेश म्हात्रेने वकिलांमार्फत उच्च न्यायालयात या गुन्ह्याचा तपास पूर्ण होईपर्यंत राज्याबाहेर जाण्यासाठी गयावया केली होती. अखेर ७ ऑगस्ट रोजी कठोर अटीशर्ती टाकत उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रेला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर न्यायालयाच्या अटीप्रमाणे रमेशसह त्याच्या तीन साथीदारांची रवानगी गोवा राज्यातील अंजुनी रिसाॅर्ट येथे करण्यात आली.
८ ऑगस्टपासून रमेश म्हात्रे गोवा येथे हद्दपार आहे. या गुन्ह्यातील रमेश म्हात्रेसह रमेश पवार, प्रमोद निकम, अक्षय कारंडे यांच्यावर न्यायालयाकडून आरोप निश्चिती झाल्यानंतर रमेशसह साथीदारांना महाराष्ट्रात प्रवेश करण्यास न्यायालयाने अनुमती दिली आहे.
पोलीस ठाण्यात हजेरी
डोंबिवलीत वास्तव्यास आल्यानंतर दर बुधवारी रमेश म्हात्रेला दुपारी ११ ते १ वेळेत विष्णुनगर पोलीस ठाण्यात हजेरी लावायची आहे. दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर हा खटला जलदगती न्यायालयासमोर चालविण्याचा आणि विशेष सरकारी वकील नियुक्तीचा आदेश न्यायालयाने दिला आहे. दोषारोपपत्र, फोरेन्सिक तज्ज्ञ अहवाल प्राप्त झाल्यानंतर सुनावणी घेणाऱ्या न्यायालयाने पाच दिवसात आरोपींवरील आरोप निश्चिती करायची आहे. हा खटला न्यायालयाने तीन महिन्यात निकाली लावण्याचे निर्देश उच्च न्यायालयाचे आदेश आहेत.
महिलेची धडपड
या गुन्ह्यात रमेश म्हात्रे आणि इतरांना उद्युक्त करणारी आरोपी महिला साधना संजय कारंडे ही गेल्या दीड महिन्यापासून आधारवाडी तुरूंगात आहे. तिची कल्याण न्यायालयात जामीन मिळण्यासाठी काही दिवसांपासून जोरदार धडपड सुरू आहे.
रमेश म्हात्रे गुन्हे प्रकरणाचा सर्वांगिण तपास करून दोषारोप पत्र बुधवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. या गुन्ह्याच्या सर्व बाजू तपासून हे दोषारोप पत्र तयार करण्यात आले आहे. – अतुल झेंडे पोलीस उपायुक्त
