कल्याण – गेल्या महिन्यात ठाकुर्लीतील रील मास्टर आणि सराईत गुन्हेगार विकासक सुरेंद्र पांडुरंग पाटील (५५) याला कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने दावडी येथील घरात मोठा शस्त्रसाठा केल्याप्रकरणी अटक केली होती. तोच सुरेंद्र पाटील आता १२ वर्षापूर्वी झालेल्या एका खुनातील आरोपी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या खून प्रकरणी पोलिसांनी सुरेंद्र याच्यासह दोन जणांना अटक केली आहे. जमीन व्यवहार वादातून २०१४ मध्ये हा खून करून मृतदेह या तीन जणांनी मुरबाड जवळील बारवी धरण परिसरातील जंगलात फेकून दिला होता.
सुरेंद्र पाटीलसह गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रकांत बाळाराम गायकर (३९, रा. गायकर कम्पाऊंड, दावडी रोड, डोंबिवली),सुरेश गोपाळ देगावत उर्फ छोटु (३२, रा. दत्ता पाटील चाळ, निरानगर, निरा निवास, ठाकुर्ली) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना
कल्याण न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना २ मेपर्यंत पोलीस कोठीडत ठेवण्याचे आदेश दिले. सुरेंद्र पाटीलवर एकूण १४ गुन्हे दाखल आहेत. विकासक म्हणून मिरवणाऱ्या सुरेंद्रची अनेक काळी कृत्ये पाहून तपास करणारे पोलीस चक्रावून गेले आहेत. दर महिन्याला सुरेंद्र कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात आरोपी म्हणून पुढे येत आहे. सुरेंद्र हा दावडी येथील एकविरा बंगल्यात राहतो.
खुनाचा प्रकार
सुरेंद्र पाटील हा विकासक असल्याने त्याचे १२ वर्षापूर्वी जमीन विकसित करणे आणि त्या संबंधीच्या आर्थिक व्यवहारातून करण अरविंद बागुल यांच्या बरोबर वाद झाला होता. या वादातून सुरेंद्र पाटील याने करण बागुल याचे ऑक्टोबर २०१४ रोजी अपहरण केले. त्यांना दावडी येथील धनलक्ष्मी सोसायटीतील आपल्या विकासक कार्यालयात डांबून ठेवले. कुटुंबीयांनी करण बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. सुरेंद्रने जमीन व्यवहाराचा राग करण बागुलवर काढण्याचा विचार करून त्याला आपल्या कार्यालयात लोखंडी सळईने बेदम मारहाण करून जागीच ठार मारले.
करणच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने आपल्या इमारतीवर काम करणारे कामगार चंद्रकांत गायकर, सुरेश देगावत यांची मदत घेतली. करणचा मृतदेह एका गोणीत भरून मुरबाड तालुक्यातील बारवी धरण भागातील घनदाट जंगलात रात्रीच्या वेळेत फेकून दिला. दोन दिवसांनी मुरबाडच्या जंगलात अनोळखी व्यक्तिचा मृतदेह फेकून दिला असल्याची माहिती मुरबाड पोलिसांना मिळाली.
तपासाअंती हा मृतदेह डोंबिवली भागातील करण बागुल यांचा असल्याचे स्पष्ट झाले. कल्याण गु्न्हे शाखेच्या पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करून या गुन्ह्यात गायकरला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीमधून सुरेंद्र पाटील, छोटुला अटक करण्यात आली. १२ वर्षापूर्वी दावडी भागात झालेल्या खुनाचा कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हे शाखेने या तीन जणांना अटक केली.
या कारवाईत गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, साहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, बळवंत भराडे, उपनिरीक्षक किरण भिसे, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, हवालदार गुरूनाथ जरग, विजय जिरे, पांडुरंग भांगरे, सुधीर कदम, सचिन भालेराव, विलास कडू, सचिन कदम, आदिक जाधव, गोरक्षनाथ पोटे, प्रशांत वानखेडे, दीपक महाजन, उल्हास खंडारे, प्रवीण किनरे, मिथुन राठोड, विनोद चन्ने, गणेश हरणे, गोरक्ष रोकडे, जालिंदर साळुंखे, सतीश सोनावणे, मंगल गावित, हवालदार बोरकर सहभागी झाले होते.
