कल्याण – कल्याण पूर्व भागात बारावीची परीक्षा देत असलेल्या एका १७ वर्षाच्या विद्यार्थिनीने मंगळवारी रात्री आपल्या राहत्या घरात पोट माळ्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. बारावीच्या परीक्षेत आपणास अपयश येऊन आपण नापास होऊ या भीतीने या विद्यार्थिनीने ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

अक्षरा नितीन रेणुसे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. बुधवारी सकाळी अक्षराने घराच्या पोटमाळ्यावर गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्यावर कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात नेले. तेथे डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. ही विद्यार्थिनी कल्याण शहरातील एका प्रथितयश महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. कल्याण शहरातील एका महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर ती पेपर देत होती. तिने बारावीच्या परीक्षेचे पेपर आपणास अवघड जात आहेत. किंवा या परीक्षेत आपणास अपयश येऊ शकते, असे आपल्या आई, वडिलांना कधीही सांगितले नव्हते. त्यामुळे आई, वडिलांना आपली मुलगी असे काही करेल असे वाटले नव्हते. पण मनातून तिला आपणास परीक्षेचे पेपर अवघड जात आहेत. आपणास या परीक्षेत अपयश येऊन आपण नापास होऊ असे वाटत होते. नापास झालो तर आपणास कुटुंबायांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी सुप्त भीती या मुलीच्या मनात असावी, अशी चर्चा सुरू आहे.

या परीक्षेच्या तणावामुळे, नापास होण्याच्या भीतीने या तरूणीने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा आहे. या विद्यार्थिनीने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपणास बारावीची परीक्षा कशी अवघड जात होती. आणि आपणास अपयश येण्याची भीती वाटत होती असे म्हटले आहे. तसेच, आपल्या आई, वडिलांविषयी तिने अंतकरणातून भावनिक भावना व्यक्त केल्या आहेत. या मुलीने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे, की मी गेल्यावर आई, बाबा तुम्ही त्रास करून घेऊ नका. मी तुम्हाला त्रास देणार नाही. या भावनिक चिठ्ठीमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आपणास परीक्षा अवघड जात आहे. असेही ही विद्यार्थिनी आपल्या मैत्रिंणींबरोबर कधी बोलली नाही. त्यामुळे तिच्या मनात काय चालले आहे हे कोणालाच कळले नाही, असे मयत विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी सांगितले. परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचे दडपण येऊ नये म्हणून शासन विविध स्तरातून प्रयत्न करत आहेत. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे समुपदेशन, परीक्षा केंद्रावर डाॅक्टर, समुपदेशक तैनात केले जात आहेत. तणावमुक्त वातावरणात दहावी, बारावीच्या परीक्षा द्याव्यात याविषयी शाळांमधून विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जात असताना विद्यार्थी आपल्या पालकांना अंधारात ठेऊन आत्महत्या करत असल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे. कोळसेवाडी पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.