कल्याण : कल्याण पूर्वेतील नेतिवली आनंदनगर भागात राहत असलेल्या एका कुटुंबीयांचा बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरातील साडे चार लाखाचा सोने, चांदीचा किमती ऐवज आणि रोख रक्कम चोरून नेली होती. मागील सात दिवसापूर्वी ही चोरी झाली होती. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू करून नेतिवली भागातील दोन चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेला साडे चार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नदीन लियाकत खान (३९, रा. भुई डोंगरी, आनंदनगर, नेतिवली, कल्याण पूर्व), राम प्रकाश गायकवाड (३६, रा. भुई डोंगरी, नेतिवली, आनंदनगर ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
कल्याण पूर्वेतील नेतिवली भागात राहत असलेल्या संजय भगवान कांबळे (४५, रा. आनंदनगर, नेतिवली, कल्याण पूर्व) हे गेल्या आठवड्यात बाहेर गावी गेले होते. या संधीचा गैरफायदा घेत नेतिवली भागातील दोन चोरट्यांनी त्यांच्या घरावर पाळत ठेऊन गेल्या आठवड्यात त्यांच्या घराचे कुलुप रात्रीच्या वेळेत तोडून दरवाजावाटे घरात प्रवेश करून घरातील सोन्या, चांदीचे दागिने, पंखे, गॅस सिलिंडर, घरगुती वापराचे साहित्य असा एकूण चार लाख ५० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला होता. कांबळे कुटुंबीय घरी आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा तुटलेला दिसला. घरातून जाऊन पाहिल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. संजय कांबळे यांनी तात्काळ कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली.
पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमोने यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. गुन्ह्या घडल्याची माहिती घेतल्यानंतर काही संशयित चोरट्यांची नावे पोलिसांना समजली. पोलिसांनी या नावांची तांत्रिक विश्लेषणातून खात्री केली. त्यावेळी त्यांना संजय कांबळे यांच्या घराच्या परिसरात राहणाऱ्या नदीन खान, राम गायकवाड यांनीच या चोऱ्या केल्या असल्याचे समजले.
पोलिसांनी या दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला. ते सापडत नव्हते. साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भालेराव या प्रकरणाचा तपास करत होते. त्यावेळी हवालदार वाघ यांना माहिती मिळाली की नदीन खान, राम गायकवाड कल्याण पूर्व भागात एका ठिकाणी येणार आहेत. पोलिसांनी त्याठिकाणी सापळा लावला. त्यांना अटक केली. त्यांच्या तपासातून त्यांनी कांबळे यांच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली. तसेच, या दोन्ही आरोपींकडून ३२ ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण चार लाख ५० हजार रूपयांचा ऐवज जप्त केला.
या कारवाईत पोलीस निरीक्षक विजय खेडकर, संदीप भालेराव, हवालदार विशाल वाघ, गोरखनाथ घुगे, सचिन आव्हाड, दिलीप कोती आणि सहकारी सहभागी झाले होते. फोटो ओळ कल्याण पूर्व नेतिवलीत घरफोडी करणारे चोरटे अटकेत.
