kalyan crime news : कल्याण पश्चिमेतील एका उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या इमारतीत एका महिलेच्या आठ वर्षाच्या मुलीचा दोन वेळा विनयभंग करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध पीडित मुलीच्या आईने तक्रार केल्यानंतर महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यानंतर आरोपी व्यक्तीला पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.
राहुल राजेंद्र पटेल (३४) असे आरोपीचे नाव आहे. तो कल्याण पश्चिमेतील बेतुरकरपाडा भागातील एव्हरेस्टनगर भागात राहतो. आरोपी राहुल पटेल याने पीडित महिलेच्या आठ वर्षाच्या शाळकरी मुलीला ती राहत असलेल्या इमारतीच्या तळमजल्याला गाठले. तेथे तिला तुला दुकानात घेऊन जातो. तेथे तुला तुझ्या आवडीचे चाॅकलेट देतो असे सांगितले. काका म्हणून संबोधणाऱ्या या व्यक्तीवर पीडित मुलीने विश्वास ठेवला. मुलगी त्याच्या पाठोपाठ दुकानात जाण्याच्या बहाण्याने निघाली. परंतु, आरोपीने पीडित मुलीला दुकानात न नेता तिला स्वताच्या घरात नेले. तेथे तिच्या मनाविरुद्ध तिच्याशी अश्लिल चाळे केले. हा प्रकार कोणाला सांगितला आणि ओरडा केला तर तुला मारून टाकेन, अशी धमकी दिली.
हेही वाचा – ठाण्यात १०० एकर वन जमीन घोटाळा? आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
हेही वाचा – ऑनलाईन जुगारामुळे कर्ज झाल्याने वृद्धेची हत्या करुन दागिन्यांची चोरी
या प्रकाराने मुलगी घाबरली. हा प्रकार गेल्या वर्षी घडून गेला होता. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी पुन्हा आरोपी राहुल पटेल याने त्या मुलीला गाठून तिला खेळण्याच्या बहाण्याने तो राहत असलेल्या इमारतीच्या पाठीमागे नेऊन तिचा विनयभंग केला. राहुल पटेल हा आपला सतत विनयभंग करत असल्याने पीडित मुलीने घरी हा प्रकार सांगितले. हा प्रकार ऐकून मुलीचे पालक हादरून गेले. त्यांनी तातडीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात संपर्क साधून राहुल पटेल विरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.