कल्याण – कल्याणमधील वाडेघर भागात कचराभूमी परिसरात सोमवारी दुपारी पोलीस उपायुक्तांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक आणि खडकपाडा पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या भिवंडी, ठाणे आणि मुंबईतील तीन सराईत अंमली पदार्थ तस्करांना अटक केली. या तस्करांकडून २१ लाख ४० हजार रूपये किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. याशिवाय या तस्करांकडे ४१ हजार रूपये किमतीचे तीन मोबाईल, १० हजार रूपयांची रोख रक्कम आढळून आली.
वसीम नूरजहाँ खान (३६ रा. बिलालनगर, बिलाल चाळ, शांतीनगर, भिवंडी), दिनेश कुमार संजीवन सरोज (३०, लुईसवाडी, यादव चाळ, वागळे इस्टेट, ठाणे), मोहित मेवालाल वर्मा (२७, रा. एल. बी. एस. रोड, मुलुंड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलीस उपायुक्तांचे अंमली पदार्थ विरोधी पथक सोमवारी दुपारी कल्याण पश्चिमेत गस्त घालत होते. यावेळी त्यांना वाडेघर कचराभूमी परिसरात तीन तरूण संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसले. पोलिसांनी दूरवरून त्यांना पाहिले. पोलीस वाहन आपल्या दिशेने येत आहे याची जाणीव झाल्यावर हे तरूण जमिनीवर ठेवलेल्या पांढऱ्या गोण्या हातात घेऊन आडोसा घेऊन बाजुला पळू लागले.
हे तरूण संशयास्पदरित्या हालचाली करत असून त्यांच्याजवळ काहीतरी संशयास्पद वस्तू असाव्यात असा विचार करून पोलिसांनी त्यांच्या दिशेने वाहन नेले. ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पथकातील पोलिसांनी चारही बाजुने सापळा लावून या तिन्ही तरूणांना घेरले. त्यांना पळून न जाण्यासाठी आवाहन केले.
पोलिसांनी या तिन्ही तरूणांना त्यांच्या हातामधील गोण्यांसह ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली त्यांच्याकडून तीन मोबाईल जप्त करण्यात आले. त्यांच्याजवळ १० हजार रूपयांची रोख रक्कम होती. त्यांच्या गोण्या सोडताच त्यामधून उग्र दर्प येऊ लागला. त्यात वाळलेली पाने आणि काड्या होत्या. हा गांजा असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी या पिशव्या जप्त केल्या. या गांजाची बाजारातील किंमत २१ लाख ४० हजार रूपये आहे. या तिघांकडून एकूण २२ लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
पोलिसांनी या तिघांची माहिती काढली, त्यावेळी खान, सरोज यांच्यावर घाटकोपर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ तस्करी कायद्याने गुन्हा दाखल आहे. वर्मा याच्यावर मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.या कारवाईत साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, उपनिरीक्षक जितेंद्र ठोके, हवालदार देवरे, राहुल शिंदे, अमित शिंदे, किरपण, खांडेकर, खरसाण सहभागी झाले होते.
