कल्याण: मोटार सायकलवरून जात असताना एका तरूणाच्या मोटार सायकलच्या हेडलाईटचा तीव्र प्रकाश झोत डोळ्यावर पडून झालेल्या वादात कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागातील तीन तरूणांनी एका १८ वर्षाच्या तरूणाला बेदम मारहाण केली आहे. मारहाण करणाऱ्या तरूणांनी धारदार हत्याराने विद्यार्थ्यावर हल्ला केल्याने तरूणाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

आर्यन राजेश पनीकर (१८) असे मारहाण आणि हल्ला झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कल्याण पूर्वेतील दुर्गा माता मंदिर भागातील शक्तीधाम काॅम्पलेक्स परिसरात राहतो. तो शाळेत शिक्षण घेत आहे. आर्यन पनीकरच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रशांत कापसे, जयेश शिंदे, अवधुत राणे यांच्या विरूध्द मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागातील तृप्ती इमारत रेल्वे क्वाॅर्टर भागात ही मारहाणीची घटना घडली आहे. आर्यन पनीकर याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की शुक्रवारी रात्री आपण कोळसेवाडी भागातील रेल्वे क्वाॅर्टर भागात उभा होतो. यावेळी समोरून एक दुचाकी वेगाने येत होती. या दुचाकीच्या हेडलाईच्या मुख्य दिव्याचा प्रखर झोत आपल्या डोळ्यावर पडल्याने आपले डोळे दिपून गेले. काही वेळ आपणास काय करावे हे समजले नाही.

दुचाकीवरून जात असलेल्या तरूणाला तक्रारदार पनीकर याने थांबविले आणि मला पाहून दुचाकीच्या दिव्याचा प्रखर झोत माझ्या डोळ्यावर का मारला असा प्रश्न केला. आपण मुद्दाम प्रखर झोत मारला नाही. तो नैसर्गिक पध्दतीने पडला, अशी कारणे देऊन तु मला थांबवून प्रखर झोताविषयी का प्रश्न करतोस, असा जाब दुचाकी स्वार प्रशांत कापसे याने तक्रारदार आर्यन पनीकर या तरूणाला केला. तु झोत मारला म्हणून मी तुला विचारणा करत आहे, असे आर्यन सांगू लागला. यावेळी प्रशांत कापसे आणि आर्यन यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली.

या बाचाबाचीतून प्रशांत कापसे आणि त्याचे इतर दोन साथीदार जयेश शिंदे, अवधुत राणे यांनी आर्यनला बचावाची संधी न देता त्याला शिवीगाळ करत ठोशाबुक्क्याने मारहाण सुरू केली. एकावेळी तीन जण मारहाण करू लागल्याने आर्यनला स्वताचा बचाव करता आला नाही. यावेळी प्रशांत कापसे याने रागाच्या भरात जवळील कोणत्या तरी धारदार हत्याराने अचानक तक्रारदार आर्यन पनीकर याच्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात आर्यनच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली आहे.

आर्यनला मारहाण केल्यानंतर दुचाकी स्वार पळून गेले. आर्यनने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन घडल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी वैद्यकीय अहवालावरून याप्रकरणी तीन तरूणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक वा. एम. धोंगडे तपास करत आहेत.