कल्याण – कल्याण पश्चिमेतील भोईरवाडी भागातील वाधवा मिडोज गृहसंकुलातील डायमंड गृहसंकुलाच्या आवारात अज्ञात इसमाने एका भटक्या श्वानाला क्रूरपणे मारले असल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या मृत्यूप्रकरणी एका प्राणीप्रेमीने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या भटक्या श्वानाच्या मृत्यूप्रकरणी महेंद्र पुरोहित यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे की, रविवारी रात्री आमच्या घरातील पाळीव श्वान घेऊन मुलगा साहिल पुरोहित हा आम्ही राहत असलेल्या डायमंड गृहसंकुलाच्या तळमजल्याला फिरण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला तेथे इमारतीच्या तळमजल्याला एक भटका काळ्या रंगाचा श्वान मृतावस्थेत असल्याचे आढळला.

मुलाने आपणास ही माहिती दिली. आपण तातडीने या श्वानावर काही उपचार करता येतील का याविचाराने घराबाहेर पडलो. पण तो श्वान मृतावस्थेत होता. त्यांच्या तोंडातून रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे अज्ञात इसमाने त्याला क्रूरपणे मारले असा संशय घेऊन पुरोहित यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

प्राणी मित्राची तक्रार

याच प्रकरणात अन्य एक गुन्हा एका प्राणी मित्राने केला आहे. कल्याण खडकपाडा भागात राहणाऱ्या राजेंद्रकौर राजपूत यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार अशी, की वाधवा मेडोजमध्ये डायमंड गृहसंकुल भागात राहणाऱ्या एक महिलेने आपणास संपर्क करून सांगितले, की आमच्या गृहसंकुलात एका मुलीला भटका श्वान चावला आहे. त्यामुळे त्या श्वानाला आमच्या सोसायटीतील तीन जणांनी लाकडी दांडक्याने मारले आहे, असे सांगितले.

या भटक्या श्वानांचा त्रास अन्य कोणाला होऊ नये यादृष्टीने आपण सोसायटीत जाऊन प्रयत्न करू लागले. त्यावेळी सोसायटीतील काही रहिवासी तेथे होते. आपण त्यांच्याशी चर्चा केली. पालिकेच्या माध्यमातून श्वान पकडून निर्बिजीकरण केंद्रात नसबंदीसाठी नेण्याच्या हालचाली करण्यात आल्या. पण तेथे काही अडचणी आल्या.

भुलीचे इंजेक्शन देणाऱ्या खासगी व्यक्तिंना सांगून त्यांच्या माध्यमातून एक श्वान पकडून पालिकेचे वाहन निघून गेले. याठिकाणी दोन श्वान चावले आहेत, असे रहिवासी सांगू लागले. त्यांना अन्य कोठेतरी सोडा अशी मागणी करू लागले. असे न करता आपण त्यांना निवारा केंद्रात नसबंदीसाठी पाठवू अशी सूचना आपण रहिवाशांनी केली. खासगी निवारा केंद्रात या श्वानांना ठेवण्याचा विचार आम्ही केला. तेथे देखभालीची रक्कम मोठी असल्याने आम्ही या श्वानांच्या नियोजनाबाबत विचार करत होतो.

या भागातील श्वानांना कायमस्वरुपी निवारा होईल असा विचार करण्यासाठी आम्ही दुसऱ्या दिवशी खडकपाडा भागातील संदीप हाॅटेल भागात जमलो. तेथे डायमंड गृहसंकुलातील रहिवासी आला. त्याला आम्ही येथील श्वान कोणाला चावू नयेत याचे नियोजन करण्यासाठी आम्ही आलो आहोत. त्यानंतर त्या रहिवाशाने सोसायटीतील महिलांना बोलावून आणून आपल्याशी भांडण सुरू केले. आपण तातडीने पोलिसांना संपर्क केला. त्यावेळी तेथील लोक आम्ही श्वानांना काही खायला देणार नाही. आम्ही त्यांना विष घालू धमकावत होते. त्यामुळे संबंधित व्यक्ती विरोधात आपली तक्रार असल्याचे प्राणी मित्र राजेंद्रकौर राजपूत यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे.