कल्याण : उपनगरीय रेल्वेतील वाढत्या प्रवासी गर्दीमुळे दररोज प्रवासी लोकलमधून पडून मरण पावत आहेत. यावर प्रभावी उपाय योजना करण्याऐवजी या प्रवासी गर्दीत भर म्हणून रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवासी संघटना, रेल्वे समिती सदस्यांना विश्वासात न घेता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण रेल्वे स्थानकांदरम्यान फेरीवाल्यांना उपनगरीय रेल्वेतून व्यवसाय करण्यास मुभा देऊन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे रेल्वेकडून फेरीवाल्यांचा देण्यात आलेला ठेका तातडीने रद्द करावा, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे, सचिव जितू विशे यांनी रेल्वेच्या विभागीय महाव्यवस्थापकांकडे केली आहे.

मागील काही वर्षापासून उपनगरीय रेल्वेतील प्रवासी गर्दी वाढत आहे. प्रवाशांना लोकलमध्ये पाय ठेवण्यास जागा नसते. लोकलमध्ये चढताना प्रवाशांना जीव मुठीत घ्यावा लागतो. कल्याणकडून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. या रेल्वे स्थानकात कसारा, कर्जत, अंबरनाथ, आसनगाव, बदलापूर, अंबरनाथ भागातून येणाऱ्या लोकल प्रवाशांनी खचाखच भरून येतात. त्यामुळे कल्याण, डोंबिवली पुढील प्रवाशांना या लोकलमध्ये चढता येत नाहीत. अनेक प्रवासी गर्दी असुनही दरवाजाला लटकत प्रवास करतात. मुंब्रा नवीन रेल्वे मार्ग झाल्यापासून तर अपघाताची मालिका अधिक वाढली आहे.

ही वाढती गर्दी आणि वाढत्या रेल्वे प्रवासी मृत्युकडे लक्ष देण्याऐवजी रेल्वे प्रशासन रेल्वे प्रवासी, रेल्वे प्रवासी संघटना यांना अंधारात ठेऊन महसुलाकडे लक्ष्य ठेऊन फेरीवाल्यांना उपनगरीय रेल्वेमध्ये वस्तू विक्रीस प्राधान्य देत असेल तर ते चुकीचे आहे. प्रवाशांशी केलेली ही प्रतारणा आहे. त्यामुळे डिसेंबर २०२५ पासून फेरीवाला ठेकेदाराला दिलेला ठेका तातडीने रद्द करावा, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने रेल्वेच्या वरिष्ठांकडे केली आहे.

सन २०२३ मध्ये रेल्वे प्रशासनाने उपनगरीय रेल्वे मध्ये फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मान्यता देण्याची कार्यवाही सुरू केली होती. त्यावेळी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ, तसेच इतर रेल्वे प्रवासी संघटनांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. प्रवासी संघटनेच्या वाढत्या रेट्यामुळे रेल्वेला हा निर्णय मागे घ्यावा लागला होता. आता कोणत्याही प्रवासी संघटना किंवा रेल्वे समिती सदस्यांना विश्वासात न घेता फेरीवाल्यांना कल्याण ते सीएसएमटी पर्यंत उपनगरीय रेल्वे मध्ये विक्री करण्यासाठी काही फेरीवाल्यांना मान्यता रेल्वे प्रशासनाने दिली आहे हे प्रवाशांवर अन्यायकारक आहे, असे प्रवासी संघटनेने म्हटले आहे.

कल्याण ते सीएसएमटी दरम्यान एकूण ४६ फेरीवाले व्यवसाय करणार आहेत. भिवंडी जवळील कोनगाव येथील कारेल सलीम यांच्या एस. एस. एन्टरप्रायझेस एजन्सीला रेल्वेने हा फेरीवाला व्यवसायाचा ठेका दिला आहे. या व्यावसायिकांमध्ये बहुतांशी फेरीवाले हे परप्रांतीय आहेत. फेरीवाले लोकलमध्ये त्यांचे ठेले, सामान, पिशव्या घेऊन चढले की त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागणार आहे.