कल्याण – सायबर गुन्ह्यात नागरिकांची फसवणूक करून ऑनलाईन माध्यमातून नागरिकांकडून मिळणारा पैसा आपल्या बँक खात्यात वळता करण्यासाठी भामट्यांनी मागील पाच वर्ष कल्याण पश्चिमेतील आचार्य अत्रे रंगंदिरासमोरील एका खासगी आस्थापनेचा वापर केला आहे. सायबर गुन्हे शाखेने केलेल्या तपासात ही बँक खाती संशयास्पद आणि नागरिकांची फसवणूक करून पैसा वळता करण्यासाठी वापरला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सायबर गुन्हे विभागाने ही बँक खाती चालविणाऱ्या आणि या खात्याशी संबंधित साथीदारंविरूध्द बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कल्याणमधील एकाच इमारतीत एकाच आस्थापनेतून १४ फसवणुकीचे व्यवहार या बँक खात्यांच्या माध्यमातून घडल्याचे नवी मुंबई महापे येथील सायबर गुन्हे शाखेने भारतीय सायबर गुन्हे शाखेला दिलेल्या माहिती आणि छाननीतून उघडकीला आणले आहेत. ठाणे सायबर गुन्हे शाखेतील हवालदार विजय सदाशिव पाटील यांच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी माहिती आणि तंंत्रज्ञान कायद्याने हे बेनामी व्यवहार करणाऱ्या भामट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण पश्चिमेतील श्री केशव, तळ पहिला माळा, हरीहर टिम्बर कम्पाऊंड, बाजारपेठ रस्ता, आचार्य अत्रे रंगमंंदिरासमोर, कल्याण पश्चिम या पत्त्यावरील आस्थापनेतून भामट्यांनी नागरिकांना वाढीव गुंतवणुकीचे आमिष दाखवून, आभासी अटक (डिजिटल ॲरेस्ट), गुंतवणुकीतून झटपट वाढीव नफ्याचे आमिष दाखवले. नागरिकांकडून ऑनलाईन माध्यमातून आपल्या विविध प्रकारच्या १४ वेगळ्या प्रकारच्या बँक खात्यावर या एकाच पत्त्याच्या माध्यमातून हे पैसे वळते करून घेतले. ही सर्व बँक खाती संशयास्पद असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

काय आहे तक्रार?

सायबर गुन्हे ठाणे शाखेचे हवालदार विजय पाटील यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की, सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संघटितपणे हे गुन्हेगार नागरिकांना मोबाईलवर संपर्क करून अर्धवेळ नोकरी, वाढीव नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडतात. आपण बेनामी व्यवहार केले आहेत असे खोटे सांगुन आम्ही तुम्हाला अटक करणार आहोत अशी भीती दाखवून नागरिकांकडून लाखो रूपये उकळत आहेत. हे व्यवहार पूर्ण करण्यासाठी भामटे, त्यांचे मध्यस्थ काही ठिकाणे निश्चित करून त्या पत्त्याचा बँक खाते उलाढालीसाठी, ती रक्कम वळती करून घेण्यासाठी वापर करतात.

भारत सरकारच्या गृह मंत्रालय अंतर्गत भारतीय सायबर समन्वय केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय सायबर गुन्हे संकेत स्थळावर ऑनलाईन फसवणूक झालेले नागरिक तक्रारी करतात. या तक्रारींच्या अनुषंगाने सायबर तक्रारींचा तपास करून ज्या बँक खात्यात पैसे वळते केले गेले आहेत. तेथून ते एटीएम, धनादेश यांनी काढले गेले आहेत याची माहिती सायबर गुन्हे शाखेकडून संकलित केली जाते. अशा संशयित लाभार्थी आणि त्यांच्या बँक खात्यांची माहिती भारतीय सायबर समन्वय केंद्रातून संकलित केल्यावर त्याची छाननी केली जाते.

नवी मुंबई महापे येथील महाराष्ट्र सायबर विभागाकडून अशी माहिती भारतीय समन्वय केंद्राला पाठविण्यात आली. या माहितीची छाननी करताना कल्याण पश्चिमेतील एकाच पत्त्यावरून विविध बँक खात्यांच्या माध्यमातून फसवणूक झालेला नागरिकांचा पैसा जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत वळता करून घेण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले आहे. सायबर गुन्ह्यासाठी ही बँक खाती वापरण्यात आली आहेत. किंवा हा खातेदार, साथीदार सायबर गुन्ह्यातील सक्रिय सभासद असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सायबर गुन्हे ठाणे शाखेने कल्याणमधील या संशयास्पद बँक व्यवहार प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.