कल्याण – आपले ई केवायसी करायचे आहे. त्यामुळे आपण तातडीने आपल्या मोबाईलचा स्क्रिनशाॅट पाठवून द्या, असे सांगून भामट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यामधील ४ लाख ९९ हजार रूपयांची रक्कम काढून घेतली. तर, दुसऱ्या एका प्रकरणात एका ज्येष्ठ नागरिकाला आम्ही तुमची टर्म इन्शुरन्स पाॅलिसीची ४ लाख ५० हजाराची रक्कम काढुन देतो असे सांगुन या ज्येष्ठ नागरिकाकडून टप्प्याने एकूण ५१ लाख रूपये उकळले. त्यानंतर टर्म पाॅलिसीचे पैसे नाहीच, पण भरणा केलेली रक्कम परत केली नाही. अशाप्रकारे कल्याणमधील रामदासवाडी आणि चिकनघर रस्त्यावरील होली क्राॅस शाळेसमोर राहणाऱ्या दोन ज्येष्ठांची ६ भामट्यांनी एकूण ५१ लाखाची फसवणूक केली आहे.
या दोन्ही ज्येष्ठ नागरिकांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शशिकांत धोंडु चौधरी (६१) कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावरील रामदासवाडी भागात आपल्या कुटुंबीयांसह राहतात. चौधरी हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिवंडी विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत आहेत. शशिकांत चौधरी यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपण पाच वर्षापूर्वी एडलवाईज कंपनीची टर्म इन्शुरन्स पाॅलिसी काढली होती.
या पाॅलिसीसाठी आपण ९९ हजार ९०० रूपये हप्ता भरत होतो. गेल्या वर्षी ही पाॅलिसी आपण बंद करून आपले हप्त्याचे पैसे परत मिळवले. गेल्या फेब्रुवारीत आपण घरात होतो. आपल्या मोबाईलवर समिधा गौतम नावाच्या महिलेने संपर्क करून आपण विमा लोकपाल कंपनीतून बोलत आहोत. आपल्या टर्म इन्शुरन्स पाॅलिसीचे ४ लाख ५० हजार रूपयांची रक्कम काढून देण्यास मी तुम्हाला मदत करते. या कामासाठी तिने आपल्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड मागवून घेतले.
एजन्ट कोड निर्माण करण्यासाठी आपणास ५४ हजार ५०० रूपये भरावे लागतील असे सांगून ती रक्कम गौतम यांनी धीरज कुमार याच्या बँक खात्याव जमा करण्यास सांगितली. त्यानंतर रक्कम हस्तांतरण शुल्क, वारस अर्ज शुल्क अशाप्रकारे विविध शुल्काच्या नावे समिधा गौतम, रवी कुमार, जैन एके, धीरज कुमार यांनी आपल्याकडून तीन महिन्यात टप्प्याने एकूण ५१ लाख ५० हजार रूपयांची रक्कम उकळली. त्यानंतर त्यांनी आपले पाॅलिसीचे पैसे काढून दिले नाहीच, पण भरणा केलेली रक्कमही हडप केली. त्यामुळे या भामट्यांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार चौधरी यांनी पोलीस ठाण्यात केली आहे.
रेल्वे निवृत्ताची फसवणूक
राजन वडक्केतत (६५) हे कल्याण पश्चिमेतील चिकनघर रस्त्यावरील होली क्राॅस शाळा परिसरात राहतात. ते रेल्वेतून सेवानिवृत्त झाले आहेत. गेल्या आठवड्यात कल्याणमधील सेंट थाॅमस चर्च येथे सकाळी साडे अकरा वाजता असताना एका इसमाने राजन यांना संपर्क केला. मी ई केवायसीमधून बोलतो. तुमचे ई केवायसी करायचे आहे. तुमचा बँक खाते क्रमांक द्या नाहीतर तुमच्या मोबाईलची खाते क्रमांक असलेली प्रतिमा पाठवा असे सांगितले. राजन यांनी आपल्या मोबाईलची प्रतिमा इसमाला पाठवली.
या संधीचा गैरफायदा घेत समोरील भामट्याने तात्काळ राजन यांचा मोबाईल हॅक केला. मोबाईल आपोआप बंद होऊन सुरू झाल्याने राजन आश्चर्यचकित झाले. त्यानंतर आपल्या बँक खात्यामधून ९९ हजार ९०० रूपये वर्ग झाल्याचे त्यांना समजले. त्यांनी तात्काळ आपले बँक खाते बंद केले. राजन यांनी दुसऱ्या दिवशी बँकेत जाऊन बँक व्यवहार तपासले. त्यावेळी पाच व्यवहारांमधून राजन यांच्या ठेव रकमांमधून गणेश जगन्नाथन, वेंकटरामन क्रिष्णा यांनी एकूण ४ लाख ९९ हजार ९९५ रूपये परस्पर काढून घेतले होते. या फसवणूक प्रकरणी राजन यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
