कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाने सात माळ्यापर्यंत इमारत उभारणीसाठी परवानी दिली असताना, कल्याण पश्चिमेतील डाॅ. आंबेडकर रस्त्यावरील एका विकासकाने पालिकेच्या परवानगीकडे दुर्लक्ष करून वाढीव दोन म्हणजे आठ आणि नऊ असे दोन वाढीव बेकायदा मजले बांधले. याविषयी तक्रारी प्राप्त होताच, पालिकेच्या क प्रभागाने या बेकायदा वाढीव मजल्यांची पाहणी करून हे नियमबाह्य बांधकाम केल्याप्रकरणी विकासक जुबेर गणी पठाण यांच्या विरूध्द महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना नियोजन (एमआरटीपी) कायद्याने बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईमुळे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत पालिकेच्या नगररचना विभागाकडून सात माळ्यापर्यंत बांधकाम परवानगी घेऊन, मग पालिका अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन वाढीव दोन ते तीन मजले उभारणाऱ्या (आठ ते १०) विकासकांमध्ये खळबळ उडाली आहे. पालिकेच्या नगररचना विभागाकडून सात माळ्यापर्यंत इमारत बांधकाम परवानगी घ्यायची. त्यानंतर अधिकाऱ्यांशी संगनमत करून वाढीव दोन मजले ठोकून मोकळे व्हायचे. अशी नवीन पध्दत कल्याण डोंबिवलीत निर्माण झाली आहे. काही मोजके विकासक सोडले तर काही विकासक सर्रास असे वाढीव मजले ठोकून मलिदा पदरात पाडून घेत असल्याची माहिती आहे.
नगररचना अधिकाऱ्यांनी एकदा नस्ती उलटापालटी आणि टेबलाखालून विकासकांना इमारत बांधकाम परवानग्या दिल्या की पुन्हा नगररचना अधिकारी त्या बांधकामाच्या ठिकाणी पाय ठेवत नाहीत. त्याचा गैरफायदा विकासक घेत असल्याच्या तक्रारी आहेत.
वाढीव मजले बेकायदा
कल्याण पश्चिमेतील डाॅ. आंबेडकर रोडवरील सीटी सर्वे क्रमांक १८४७ या भूखंडावर गणी हाईट्स या निर्माणाधिन इमारतीत विकासक जुबेर गणी पठाण यांनी आठ आणि नववा मजला बेकायदा बांधले आहेत, अशी तक्रार ठाणे येथील अन्याय निवारण भ्रष्टाचार प्रतिबंधक सस्थेचे केनेथ आर. बी. यांनी दोन वर्षापूर्वी पालिकेकडे केली होती. या तक्रारीप्रमाणे क प्रभागाने नगररचना विभागाल कळविले. नगररचना विभागाने जुबेर पठाण यांच्या इमारतीला मे २०२३ मध्ये बांधकाम परवानगी दिली आहे. या परवानगीप्रमाणे जुबेर यांना सात माळ्यापर्यंत इमारत उभारणीस परवानगी दिली आहे, असे कळविले.
या माहितीप्रमाणे क प्रभागाने विकासक जुबेर पठाण यांना नगररचना विभागाच्या बांधकाम परवानगीव्यतिरिक्त जी आठ आणि नवव्या माळ्याची बांधकामे केली आहेत. त्याची बांधकाम परवानगी सादर करण्यासाठी पठाण यांना नोटीस बजावली. याप्रकरणी क प्रभागाने चार वेळा सुनावण्या ठेवल्या. या सुनावणीत पठाण वाढीव बेकायदा आठ आणि नवव्या माळ्याची बांधकाम परवानगी सादर करू शकले नाहीत.
त्यामुळे क प्रभाग साहाय्यक आयुक्तांनी गणी हाईट्स या नव्या इमारतीमधील आठवा आणि नववा माळा महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम २६० (२), ४७८ अन्वये अनधिकृत घोषित केला. हे वाढीव बेकायदा बांधकाम तातडीने स्वखर्चाने काढून टाकण्याचे आदेश क प्रभागाने विकासक जुबेर पठाण यांना दिले.
आदेश देऊन विकासकाने वाढीव बेकायदा मजल्यांचे बांधकाम हटवले नाही. याऊलट ही बेकायदा बांधकामे पूर्ण करून घेतली. त्यामुळे पालिकेच्या आदेशाचा भंग केला म्हणून विकासक पठाण यांच्या विरूध्द क प्रभागाचे अधीक्षक चिंतन बेरडिया यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण, डोंबिवलीत अशाप्रकारे बेकायदा मजले उभारणाऱ्या विकासक, भूमाफियांविरूध्द एमआरटीपीचे गुन्हे दाखल करण्याची अनेक तक्रारदारांची मागणी आहे. डोंबिवलीत अशा बेकायदा मजल्यांचे प्रमाण अधिक आहे. अशा बांधकामांमध्ये नगररचना विभागातील काही अभियंते छुप्या पध्दतीने भागीदार असल्याची चर्चा आहे.
