कल्याण – लग्न करण्याचे आमिष दाखवून कल्याण मधील एका ४३ वर्षाच्या दिव्यांग व्यावसायिकाची ३५ लाख रुपयांची दोन महिलांनी फसवणूक केल्याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दोन महिलांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार सचिन प्रकाश घोलप यांनी याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. ते कल्याण पश्चिमेतील रामबाग, लेन नं ४, घोलप निवास, कल्याण पश्चिम येथे राहतात. गुन्हा दाखल महिलांमध्ये क्राॅस बाजार रोड, बांद्रा पश्चिम, मुंबई येथील एका महिलेचा आणि कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील एका महिलेचा समावेश आहे.
पोलीस ठाण्यातील तक्रारीतील माहिती, अशी तक्रारदार सचिन घोलप यांचे कल्याण-मुरबाड रोडवरील पूर्णिमा टॉकीज चौकात गणेश मोबाईल सेंटर नावाचे मोबाईल दुरुस्तीचे दुकान आहे. पालिकेकडून त्यांना याठिकाणी गाळा मिळाला आहे. २०१० पासून एक महिला या मोबाईल दुकानात मोबाईल दुरुस्तीसाठी दुकानात येत होती. यामधून तक्रारदार आणि त्या महिलेची ओळख वाढली.
तक्रारदार यांच्या बहिणीचे लग्न होणार असल्याने विवाहासाठी ते थांबले होते. पण त्यांच्या एका परिचित महिलेने सचिन यांना विवाह करण्याची सूचना केली. तक्रारदाराने परिचयातून एका महिलेशी लग्न करण्याची तयारी केली.विमा कंपनीत व्यवस्थापक असलेल्या महिलेबरोबर तक्रारदाराचा परिचित महिलेने परिचय करून दिला. तक्रारदाराने त्या महिलेला लग्नाविषयी विचारले. त्यावेळी त्यांनी आपण घरातील कर्त्या प्रमुख आहेत. आपण लोकांकडून घेतलेले कर्ज, व्याजाने घेतलेले पैसे यामुळे लग्न करू शकत नाही असे सांगितले. हे कर्ज फेडून स्थिरस्थावर झाले तर आपण विवाह करू शकतो अशी अट तक्रारदाराला टाकली. या नोकरदार महिले बरोबर तक्रारदार विवाहासाठी तयार झाला.
दरम्यान २०२० ते २०२४ या कालावधीत परिचित महिला आणि विवाहासाठी तयार झालेली महिला यांनी संगनमत करून वेळोवेळी सचिन घोलप यांच्याकडून एकूण ३५ लाख रुपये उकळले. टप्प्याने या रकमा आपल्याकडून ऑनलाईन माध्यमातून घेण्यात आल्या आहेत, असे तक्रारदाराने तक्रारीत म्हटले आहे.एप्रिल २०२४ रोजी तक्रारदार सचिन आणि विवाहोच्छुक महिलेने नोंदणी कार्यालयात विवाह नोंदणी करण्याचे ठरले होते. मात्र विवाहोच्छुक महिला विवाह नोंदणी कार्यालयात आली नाही.
याप्रकरानंतर तक्रारदार या महिलेच्या बांद्रा येथील कार्यालयात गेला. तेथे त्यांना कार्यालयाबाहेर बोलावून घेतले. त्यावेळी त्या महिलेने तुम्हाला तुमच्याशी विवाह करायचा नाही. तुम्हाला काय करायचे ते करा, असा इशारा दिला. या सर्व प्रकरणात दोन्ही महिलांनी आपली फसवणूक केली म्हणून तक्रारदार सचिन यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता ४२० आणि ३४ या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक हनुमंत हुम्बे करीत आहेत.
