कल्याण – अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेशोत्सव मिरवणुकीत ट्रॅक्टरवर डीजे दणदणाटी वाद्ये बसवून न्यायालय, पोलिसांनी ध्वनी मर्यादा घालवून दिली असताना, या मर्यादापेक्षा अधिक आवाजात डीजेचा दणदणाट करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. तसेच ,पोलिसांनी दणदणाटी वाद्ये वाजविण्यास प्रतिबंध केला असताना, त्याचे पालन केले नाही. तसेच, ध्वनी मर्यादेबद्दल दिलेल्या आदेशाचा भंग केला म्हणून येथील बाजारपेठ पोलिसांनी अहिल्याबाई चौकातील जय महाराष्ट्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रणय नायडू आणि डीजे वाद्याचे परिचालक विनय मलबारी यांच्या विरूध्द बाजारपेठ पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, भारतीय न्याय संहिता कायद्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यातील हवालदार विशाल चौधरी यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की सण, उत्सव काळात शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त यांनी मनाई आदेश जारी केला होता. या कालावधीत दणदणाट करून सार्वजनिक शांततेचा भंग करणारी डाॅल्बी, डीजे, ध्वनी प्रदुषण करणारी वाद्ये वाजविण्यास सार्वजनिक ठिकाणी बंदी घालण्यात आली होती.

अनंत चतुर्थीच्या दिवशी साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे, हवालदार रमाकांत पाटील, विशाल चौधरी बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीतील वाद्यांची ध्वनी मापन करण्यासाठी फिरत होते. बाजारपेठ रस्ता गांधी चौक येथे मिरवणुकीत मोठ्याने वाद्यांचा आवाज येत असल्याने आम्ही तेथे पोहचलो. तेथे जय महाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या गणेशोत्सव मिरवणुकीत ट्रॅ्क्टरवर डिजे ठेऊन त्याचा मोठ्याने आवाज ठेऊन ते वाजविले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. ध्वनी मापन यंत्रावर या वाद्याची मर्यादा पोलिसांना १०१.६ आढळुन आली. ही ध्वनी मर्यादा अधिक असल्याने परिसरातील सर्व प्रकारच्या नागरिकांना या दणदणाटी वाद्याचा त्रास होत होता. या वाद्याचा त्रास विचारात घेऊन पोलीस पथकाने जय महाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या पदाधिकारी, डिजे परिचालकाला हे वाद्य बंद करण्याच्या सूचना केल्या. तरीही या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या आदेशाचा भंग करून डीजे वाद्य वाजविणे सुरूच ठेवले. त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग करून सार्वजनिक उपद्रव निर्माण केला म्हणून बाजारपेठ पोलिसांनी जय महाराष्ट्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रणय नायडू, डीजे मालक विनय मलबारी यांच्या विरूध्द बाजारपेठ पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल केला आहे.

कल्याण, डोंबिवलीत प्रथमच अशाप्रकारचा गुन्हा दाखल झाला आहे. यावेळी न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी दणदणाटी वाद्ये वाजविण्यास मज्जाव करण्याचे आदेश सरकारला दिले होते. या आदेशामुळे कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी अनेक गणेशोत्सव मंडळांनी मिरवणुकीत दणदणाटी वाद्ये वाजविण्याचे टाळले. पोलिसांनी आदेश देऊनही कल्याणमधील या मंडळाने सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.