कल्याण – डोंबिवली पश्चिमेतील कोपर रस्त्यावरील म्हाळसाई चाळ भागातील, कोपर ९० फुटी रस्ता, इंदुबाई म्हात्रे चाळ परिसरातील कांदळवन तोडून, त्यावर मातीचा भराव करून उभारण्यात आलेल्या बेकायदा चाळी तातडीने जमीनदोस्त करा, असे आदेश कल्याण डोंबिवली पालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाच्या साहाय्यक आयुक्त सुषमा मांडगे यांनी आपल्या वरिष्ठांच्या आदेशाने डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना दिले आहेत.

गेल्या वर्षापासून तक्रारदार विनोद जोशी, कल्पेश जोशी हे डोंबिवली पश्चिमेतील सरोवरनगर, कोपर गाव भागातील बेकायदा चाळी तोडण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त, ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत.

डोंबिवली पश्चिमेतील खाडी किनारचे कांदळवनाचे हरितपट्टे नष्ट करून, त्यावर मातीचे भराव करून भूमाफियांनी कोपर भागातील ९० फुटी रस्ता, इंदुबाई म्हात्रे चाळ, म्हाळसाई चाळ परिसरात ७० हून बेकायदा चाळी उभारल्या आहेत. या चाळींसाठी खाडी किनारा बुजविण्यात आला आहे. पावसाळ्यात खाडीचे पाणी या चाळींमध्ये घुसून ते कोपर गाव हद्दीतील गृहसंकुले, या भागातील जुन्या चाळींमध्ये घुसण्याची शक्यता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

सरोवरनगर बेकायदा

अशाच पध्दतीने डोंबिवलीतील सरोवरनगर भागात सुमारे २५० बेकायदा चाळी आहेत. या चाळींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तक्रारदार कल्पेश जोशी यांनी पालिका आयुक्त, ह प्रभाग अधिकारी, शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. या दोन्ही तक्रारदारांच्या तक्रारींची पालिका दखल घेत नाही.

अन्नत्याग आंदोलन

कोपर गाव परिसरातील बेकायदा चाळींवर पालिका आयुक्त, ह प्रभाग साहाय्यक आयुक्त सावंत कारवाई करत नाहीत म्हणून तक्रारदार विनोद जोशी यांनी गेल्या सहा दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास प्रधान सचिव डाॅ. गोविंद राज, महसूलमंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईत आझाद मैदान येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. मागील सहा दिवसांपासून तक्रारदार अन्न न घेता उपोषण करत असल्याने त्याच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्यात शासनाचा नगरविकास विभागा, कोकण विभाग नगर परिषद संचालनाच्या वरिष्ठांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून कोपर, सरोवरनगर परिसरातील बेकायदा चाळी तोडण्याचे आदेश दिले होते. पालिकेने हे आदेश दुर्लक्षित केले.

पालिका दखल

या अन्नत्याग आंदोलनाची गंभीर दखल घेऊन अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त सुषमा मांडगे यांनी ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सावंत यांना पत्र पाठवून कोपर भागातील तक्रारदाराच्या मागणीप्रमाणे सूचित केलेल्या सर्व बेकायदा चाळी जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले आहेत.

कोंबडी खुराडा जैसे थे

कोपर पश्चिम रेल्वे स्थानक भागात राजकीय आशीर्वादाने कोंबडीच्या खुराड्याच्या नावाने एक बेकायदा बांधकाम हरितपट्टा नष्ट करून उभारण्यात आले. आता पुन्हा या खुराड्या लगत हरितपट्टा नष्ट करून १०० बाय १०० क्षेत्रात खुराड्याचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. याठिकाणी जोत्याची उभारणी करण्यात आली आहे. त्यावर बेकायदा बांधकाम करण्याचे नियोजन खुराड्याच्या मालकांनी केले आहे. या खुराड्याला पालिकेची परवानगी घेतली आहे का याची तपासणी करून कारवाई केली जाईल, असे नगररचना विभागाचे साहाय्यक संचालक संतोष डोईफोडे यांनी सांगितले आहे.