कल्याण – आपल्या दारात येणाऱ्या घंटागाडीत ओला, सुका कचरा टाका. सार्वजनिक ठिकाणी, कचरा कुंडीत कचरा टाकू नका असे वारंवार जाहीर करूनही अनेक नागरिक पालिकेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. आणि सार्वजनिक ठिकाणी रस्ता, चौक, कोपऱ्यावर दिवसा, रात्री कचरा फेकून सार्वजनिक स्वच्छतेत विघ्न आणतात. अशा कल्याण पूर्वेतील विनायक काॅलनीमधील एकूण १६ नागरिकांवर पालिकेच्या घनकचरा विभागाने कायदेशीर कारवाई केली.

सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकू नका. घरात ओला, सुका कचरा वेगळा करा. मग तो आपल्या दारात येणाऱ्या घंटागाडी कामगाराकडे ओला, सुका कचरा स्वीकारण्याचा वार असेल त्या दिवशी द्या, असे पालिकेकडून सतत जाहीर करूनही कल्याण पूर्वेतील विनायक काॅलनीतील काही रहिवासी पालिकेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत होते. ते आपल्या घराच्या परिसरातील कोपऱ्यावर कचरा फेकून सार्वजनिक स्वच्छतेत अडथळा आणत होते. अशा रस्त्यांवर कचरा फेकणाऱ्या रहिवाशांना पालिकेच्या कामगारांनी पाळत ठेऊन कचरा फेकताना पकडले होते. आणि त्यांना अशाप्रकारे रस्ते, चौक, जुन्या कचराकुंडीच्या ठिकाणी कचरा न फेकण्याची सूचना केली होती.

तरीही हे नागरिक सार्वजनिक ठिकाणी

कचरा फेकत असल्याने घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या आदेशावरून कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांच्या सहकार्याने अशा नागरिकांवर भारतीय नागरिक न्याय संहिता सन २००३ च्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करण्यात आली. यावेळी दोन नागरिकांवर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सार्वजनिक स्वच्छतेचे उल्लंघन केले म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले. तेरा रहिवाशांना कचरा फेकत असताना घटनास्थळीच समजपत्रे देण्यात आली.

कचरा मुक्तीत विघ्न

कल्याण डोंबिवली पालिका शहरे कचरा मुक्त करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने स्वच्छ भारत अभियान आणि स्थानिक स्वच्छता नियमांच्या अनुषंगाने विशेष स्वच्छता मोहिमा कल्याण, डोंबिवली शहरात राबविण्यास सुरूवात केली आहे. दिवस, रात्र शहरातील कचरा उचलण्यासाठी विशेष नियोजन केले आहे. नागरिकांना त्यांच्या वेळेप्रमाणे पालिकेकडे ओला, सुका कचरा देता यावा म्हणून सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत शहराच्या विविध भागात घंटागाड्यांचे नियोजन केले आहे. तरीही अनेक नागरिक या स्वच्छता अभियानात अडथळे आणत असल्याने पालिकेच्या घनकचरा विभागाने अशा नागरिकांवर आता थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यासाठी पाऊल उचलले आहे. त्याची सुरूवात कल्याण पूर्वेतील विनायक काॅलनीमधून करण्यात आली आहे.

विनायक काॅलनी भागातील कारवाई ड प्रभागाचे साहाय्यक आयुक्त उमेश यमगर, स्वच्छता अधिकारी विक्रम गायकवाड, उदय निकुंभ, स्वच्छता निरीक्षक ,सचिन सुर्वे, हितेश सोळंकी, अमित भालेराव, मुकादम किशोर जाधव, युनिट अधिकारी सानु वर्गिस, साहिल साठे यांच्या पथकाने केली.

नागरिकांना घराच्या बाहेर न पडता आपल्या घरातून पालिकेला ओला, सुका कचरा देता यावा असा विचार करून शहराच्या विविध भागात सोसायट्या, चाळी, झोपडपट्टी भागात घंटागाड्यांचे नियोजन केले आहे. अनेक नागरिक आपले शहर स्वच्छ असावे असा विचार न करता सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून सार्वजनिक स्वच्छतेत अडथळे आणत आहेत. अशा नागरिकांवर यापुढे फौजदारी कारवाई केली जाणार आहे. – रामदास कोकरे उपायुक्त, घनकचरा विभाग.