कल्याण- उन्नत्तीकरणाच्या कामासाठी गेल्या दोन महिन्यापासून संथगती, तर कधी बंद असलेले कल्याण डोंबिवली पालिकेचे ऑनलाईन संकेतस्थळ बुधवारपासून सुरू करण्यात आले. पालिका हद्दीतील रहिवाशांना आता घरबसल्या पालिका नागरी सेवांचा लाभ घेणे शक्य होणार आहे. कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून लोकाभिमुख प्रशासन (ई-गव्हर्नन्स) प्रणालीचे उद्घाटन बधुवारी आयुक्त डॉ.. विजय सूर्यवंशी, स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे, पालिका माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रशांत भगत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
पालिकेची ऑनलाईन सुविधा गेल्या दोन महिन्यापासून संथगती, तर कधी बंद राहत होती. त्यामुळे ऑनलाईन सेवांच्या माध्यमातून पालिकेच्या सुविधा, तक्रारींचे निवारण, देयक भरणा करणाऱ्या करदात्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. पालिकेचे माजी आयुक्त श्रीकांत सिंग यांच्या प्रयत्नाने पालिकेत ई-गव्हर्नन्स प्रणाली २००२ मध्ये सुरू झाली. अशाप्रकारचे ऑनलाईन कामकाज करणारी कल्याण डोंबिवली ही देशातील पहिली महापालिका होती. या प्रणालीचा उपयोग त्यानंतर स्वामीत्व धन कल्याण डोंबिवली पालिकेला देऊन राज्यातील, देश, विदेशातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी केला. २२ वर्षापूर्वीची ही प्रणाली जुनी झाल्याने ती संथगतीने काम करत होती.

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून या प्रणालीचे उन्नत्तीकरणाचे (सॉफ्ट लाँच) काम गेल्या अनेक महिन्यांपासून स्मार्ट सिटी कंपनीतर्फे सुरू होते. हे काम गेल्या आठवड्यात पूर्ण झाले. या प्रणालीची एकदा तालीम घेण्यात आली. त्यात कोणत्याही तांत्रिक बिघाड नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बुधवारी ही प्रणाली लोकांसाठी खुली करण्यात आली, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांनी दिली.

ऑनलाईन सुविधा

या प्रणालीतून मालमत्ता कर, पाणीपट्टी देयक ऑनलाईन भरण्याची सुविधा, जन्म, मृत्यू प्रमाणपत्र, बाजार परवाना शुल्क, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, तक्रार निवारण या सुविधा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध होणार आहेत. या सुविधा पालिकेच्या नागरी सुविधा केंद्र, प्रभाग कार्यालयात न जाता रहिवाशांना घर, कार्यालयातून बसून घेता येणार आहेत. ही प्रणाली सुरू होताच पालिका हद्दीतील रहिवाशांनी मालमत्ता कर, पाणी देयकाचा ९० लाख रूपयांचा भरणा केला. पालिकेचा निम्म्याहून अधिक कर ऑनलाईन प्रणालीतून जमा होतो, असे माहिती तंत्रज्ञान विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

कल्याण, डोंबिवली, २७ गाव हद्दीतील रहिवाशांना ऑनलाईन सेवा सुविधांचा अधिक लाभ घेण्याचे आवाहन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका चालू वर्षा बरोबर, आगामी वर्षाचा मालमत्ता कर भरणा रहिवाशांना भरण्याची सुविधा उपलब्ध करून देते. यामुळे पालिकेला आगाऊ पैसा मिळून हा निधी विकास कामांसाठी वापरणे शक्य होते. ही प्रणाली आणि पध्दत कल्याण डोंबिवली पालिकेने सुरू करावी, असे मत यापूर्वी डोंबिवलीत राहत असलेल्या आता पुणे, पिंपरी-चिंचवड भागात राहण्यासाठी गेलेल्या रहिवाशांनी व्यक्त केले.