कल्याण – कल्याण डोंबिवलीत दिवसेंदिवस बेशिस्त, मुजोर रिक्षा चालकांची संख्या वाढत आहे. मागील दोन दिवसांच्या कालावधीत तीन स्वतंत्र घटनांमध्ये भरधाव वेगात असलेल्या रिक्षांनी दिलेल्या धडकेत, रिक्षा पलटी होऊन एकूण तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. रिक्षा चालकाच्या बेशिस्तपणामुळे एका प्रवासी महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.
झटपट प्रवासी मिळविण्यासाठी रिक्षा चालकांची कल्याण, डोंबिवलीत चढाओढ सुरू आहे. रिक्षा वाहनतळ सोडून मुख्य वर्दळीचे रस्ते, रेल्वे स्थानकांच्या प्रवेशव्दारावर उभे राहून प्रवासी करतात. झटपट प्रवासी मिळवून वाढीव फेऱ्या मारता येतील यासाठी सुसाट वेगाने रिक्षा चालवून इतर वाहन चालक, पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत.
शहाडगाव येथे राहणारे जय प्रकाश यादव (२८) यांनी सोनारपाडा भागात राहणाऱ्या प्रभण्णा बाबुराव जिरोले (४२) यांच्या विरूध्द तक्रार केली आहे. प्रभण्णा हे रिक्षा चालक आहेत. मंंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान कल्याण शिळफाटा रस्त्याने गोळवली गाव हद्दीतील मोती मिठाईवाला दुकानासमोरील रस्त्यावरून प्रभण्णा जिरोले हे रिक्षा चालक भरधाव वेगाने प्रवासी घेऊन चालले होते.
निष्काळजीपणा, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून प्रभण्णा रिक्षा चालवित असल्याने त्यांचा रिक्षा वरील ताबा सुटला आणि रिक्षा वेगाने रस्त्यावरून घसरत पलटी झाली आणि रस्त्याच्या कडेला जाऊन आपटली. यामध्ये रिक्षेतील प्रवासी आशिष चव्हाण यांच्या सर्वांगाला गंभीर दुखापती झाल्या. तक्रारदाराची बहिण मीनल प्रकाश यादव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. रिक्षा चालकाच्या निष्काळजीपणाने हा मृत्यू झाल्याने जय यादव यांनी रिक्षा चालका विरूध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दुसऱ्या एका प्रकरणात कल्याण पूर्वेत चिंचपाडा भागात एका भरधाव रिक्षा चालकाच्या रिक्षेने दिलेल्या धडकेत एक २३ वर्षाची महिला गंभीर जखमी झाली आहे. या महिलेला कोणतीही मदत न करता रिक्षा चालक घटनास्थळावरून पळून गेला. या अपघातात चिंचपाडा भागात राहणाऱ्या जान्हवी सौरे (२३) गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी अज्ञात रिक्षा चालका विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. चिंचपाडा भागातील आयडियल शाळा भागात हा अपघात घडला आहे.
जान्हवी सौरे आपल्या कुटुंबीयांसह रिक्षेने कल्याण रेल्वे स्थानकाकडून चिंचपाडा येथील घरी मंगळवारी सकाळी जात होत्या. त्याचवेळी चिंचपाडाकडून रेल्वे स्थानकाकडे एक रिक्षा चालक भरधाव वेगाने जात होता. या रिक्षा चालकाने तक्रारदार जान्हवी बसलेल्या रिक्षेला जोराने कट मारली. त्यामुळे त्याच्या रिक्षेचा भाग जोराने लागल्याने जान्हवी जखमी झाल्या.
अन्य एका घटनेत रात्रीच्या वेळेत काम संपवून सनी तिवारी आणि त्यांचा मित्र मलंग रस्त्याने मंंगळवारी रात्री १२ वाजता पायी चालले होते. त्यावेळी एका भरधाव वेगाने चाललेल्या रिक्षा चालकाने सनी तिवारी, त्यांचा मित्र शुभम सिंग यांना कट मारली. या दोघांनी आपण व्यवस्थित रिक्षा चालव असे रिक्षा चालकाला सांगितले. त्याचा राग येऊन त्या रिक्षेतून सुमित सिंग आणि त्याचा मित्र उतरले त्यांनी सनी तिवारीचा मित्र शुभम सिंंग याला बेदम मारहाण केली. यावेळी सुमित सिंगच्या मित्राने शुभमवर चाकूने हल्ला करून जखमी केले. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे.

