कल्याण – प्रदूषणकारी धुराड्यांच्या आस्थापनांवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कल्याण डोंबिवली पालिकेकडून प्रदूषण करणाऱ्या आस्थापना, लाकूड वापरून भट्टी पेटविणाऱ्या बेकऱ्यांवर पालिकेकडून कारवाई सुरू आहे. या नियमितच्या कारवाईमुळे भट्टीसाठी लाकूड, कोळसा, तुसाचा आधार घेऊन बेकरी चालविणाऱ्या कल्याण, डोंबिवलीतील ७० हून अधिक बेकरी चालकांनी आपल्या लाकूड भट्टी, धुरांड्याच्या बेकऱ्या बंद करून विद्युत शेगडीवर चालविणाऱ्या बेकऱ्या सुरू करण्याला प्राधान्य दिले आहे. मागील अनेक वर्षापासून कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत ७० हून अधिक बेकऱ्या शहराच्या विविध भागात आहेत. जुन्या बेकऱ्यांमधील भट्टयांना लाकूड, कोळसा किंवा तांदळाचा भुसा वापरला जातो. या भट्ट्या पेटविल्यानंतर त्यामधील धूर बेकरीतील धुरांड्यामधून (चिमणी) प्रक्रिया न करता हवेत सोडला जातो. त्यामुळे हवा प्रदूषण होते. हवा प्रदूषणाविषयी न्यायालयांनी वेळोवेळी कठोर निर्देश दिले आहेत. प्रदूषण नियंत्रणासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, शासनाच्या नियंत्रणाखालील पालिका, नगरपालिका, पंचायती हवा प्रदूषण रोखण्यासाठी अधिक गतिमान झाल्या आहेत.

या कार्यवाहीत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासनाकडून कठोर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत प्रभाग साहाय्यक आयुक्तांनी आपल्या हद्दीतील बेकऱ्या, प्रदूषण करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई सुरू केली आहे. जुनी बेकरी चालक धास्तावले अनेक वर्षाच्या आपल्या जुन्या बेकऱ्यांवर कारवाई होत असल्याने पालिका हद्दीतील बेकरी चालक धास्तावले आहेत. जुनी लाखो रूपयांची यंत्रणा मोडीत काढून प्रदूषणरहित यंत्रणा बसविण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च करावा लागेल या विचाराने अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते लाकडाचाच वापर करून आपल्या बेकऱ्या चालवित आहेत. अशा बेकऱ्यांवर पालिका अधिकाऱ्यांनी कारवाया सुरू केल्या आहेत. काही दिवसापू्वी फ प्रभागाने शेलार नाका परिसरातील त्रिमूर्तीनगर, ९० फुटी रस्त्यावरील खंबाळपाडा येथील लाकडाचा वापर करून बेकरी चालविणाऱ्या दोन बेकऱ्यांवर कारवाई केली. पालिकेची ही कारवाई सुरूच राहणार असल्याने अनेक बेकरी मालकांनी लाकूड विरहित धुरांडी नसलेली विद्युत शेगडीची यंत्रणा आपल्या बेकरीत बसविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विद्युत शेगड्यांची प्रतीक्षा राज्याच्या विविध भागात बेकरीतील भट्टी पेटविण्यासाठी लाकडाचा वापर केला जातो.

हा धूर धुरांडीमधून बाहेर सोडला होता. अशा बेकरी चालविणाऱ्या बेकरी मालकांवर शासनाच्या विविध आस्थापनांकडून कारवाई सुरू आहे. ही कारवाई टाळण्यासाठी आपल्या बेकरीत धूरमुक्त यंत्रणा बसविण्यासाठी राज्यातील अनेक बेकरी मालकांनी विद्युत शेगडीसाठी पुणे येथील उत्पादक कंपन्यांकडे नोंदणी केली आहे. बेकरी मालकांकडून एकावेळी ही नोंदणी गेली असल्याने शेगडी उत्पादनावर ताण आला आहे. ऑगस्ट, सप्टेंबर २०२६ मध्ये नोंदणी केलेल्या बेकरी मालकांना डिसेंबर २०२६ मध्ये विद्युत शेगडी मिळणार आहे. कर्नाटक, गुजरात, सुरत, आंध्रप्रदेशात विद्युत शेगड्या मिळतात. या शेगड्यांसाठी दूरवर जाण्यापेक्षा जवळचा प्रवास म्हणून बेकरी मालक पुणे येथील विद्युत शेगडी उत्पादकाला प्राधान्य देत आहेत. शेगडीत काही बिघाड झाला तर पुन्हा इतर राज्यातून तंत्रज्ञ बोलवावा लागेल, अशी भीती चालकांना आहे. कल्याण, डोंबिवलीतील बहुतांशी बेकरी मालकांनी विद्युत शेगडी नोंदविण्यासाठी पुढाकार घेतला अशी माहिती काही बेकरी मालकांनी दिली.

कोट हवा प्रदूषणामुळे लाकडाचा वापर करून चालविण्यात येणाऱ्या भट्टीच्या बेकऱ्यांवर, धुराड्यांच्या (चिमणी) बेकऱ्यांवर शासन यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. या कारवाईत अडथळा आणला गुन्ह्याची तरतूद आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचा विचार करून कल्याण, डोंबिवली भागातील अनेक बेकरी चालकांनी विद्युत शेगडीसाठी नोंदणी पुण्याच्या उत्पादकांकडे केली आहे. हेमल परीख बेकरी मालक.