डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या वरिष्ठांनी आम्हाला पदे, विकास कामे करून देण्याची आश्वासने दिली होती. पण गेल्या सात महिन्याच्या कालावधीत कामे, पदे नाहीच, उलट भाजपसाठी निष्ठेने काम करूनही आम्हाला पदे, आमची कामे करून न देता नवख्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. आणि आम्ही केलेल्या कामावर भाजपच्या वरिष्ठांनी बोळा फिरवला. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यपध्दतीवर विश्वास ठेऊन आम्ही शिंदे शिवसेनेत प्रवेश केला, असे भाजपमधून शिंदे गटात दाखल झालेल्या नाराज पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सांगितले. भाजपचे पदाधिकारी चंद्रशेखर म्हात्रे, महिला पदाधिकारी वंदना कट्टी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी माध्यमांना सांगितले,
डोंबिवली, कल्याणमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाराज होऊन गुरुवारी डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, आमदार राजेश मोरे, नगरसेवक महेश गायकवाड उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष लांडगे यांनी सांगितले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाची गतीमान पध्दत, विकास कामांचा धडाका आणि तळागाळातील कार्यकर्त्याची दखल घेण्याची वृत्ती यामुळे काही कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी स्वताहून हा प्रवेश केला आहे.
या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत सन्मान राखला जाईल. कोणी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्याने स्वताहून आमच्या पक्षात येण्याची तयारी दर्शवली असेल तर त्याला फोडाफोडी म्हणत नाही. त्यामुळे हे पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत आले असले तरी त्याचा युती धर्मावर परिणाम होणार नाही आणि त्याची तेवढी काळजी घेतली जाईल, असे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
शिवसेनेने करार मोडला
मागील काही महिन्यापूर्वी शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये एक अलिखित करार झाला आहे. या कराराप्रमाणे भाजपने शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी फोडून आपल्या पक्षात घ्यायचे नाहीत. आणि शिंदे शिवसेनेने भाजपमधील पदाधिकारी, कार्यकर्ते फोडून आपल्या पक्षात दाखल करून घ्यायचे नाहीत. या कराराचे शिंदे शिवसेनेकडून उल्लंघन झाले आहे. त्यांनी हा करार मोडीत काढला आहे, अशी टीका या फोडाफोडीच्या विषयावर कल्याण जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी माध्यमांशी बोलताना केली.
मात्र, शिंदे शिवसेनेने आमचा एक पदाधिकारी फोडला असेल तर आम्ही त्यांचे दोन पदाधिकारी फोडू आणि जशास तसे कृतीने उत्तर देऊ, असा इशारा जिल्हाध्यक्ष परब यांनी शिंदे शिवसेनेला दिला. लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुका भाजप, शिंदे शिवसेनेने युती म्हणून लढविल्या. जिंकल्या. युती धर्माचे पालन करत कल्याण डोंबिवलीत भाजप, शिंदे शिवसेनेची सत्ता आली.
याची जाणीव असताना आमचे पदाधिकारी फोडून युती धर्माचा करार शिंदे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, आमदार राजेश मोरे यांनी मोडित काढला आहे. हा सर्व विषय आम्ही भाजपच्या वरिष्ठांना कळविला आहे. त्यांचे उत्तर येईल त्याप्रमाणे योग्य निर्णय घेतला जाईल, असे परब यांनी सांगितले. फोटो ओळ कल्याण, डोंबिवलीतील भाजपचे कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत.
