कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टरांना शिवीगाळ करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांचे कोपर प्रभागाचे नगरसेवक पद रद्द करा, या मागणीसाठी तक्रारदार कल्पेश जोशी यांनी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांना राज्य निवडणूक आयोगाच्या पत्राचा दाखला देत दुसरे स्मरणपत्र दिले. उच्च न्यायालयाने म्हात्रे प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यामुळे तपास यंत्रणा म्हात्रेंची माहिती मिळवण्यासाठी कामाला लागल्या आहेत. अशा परिस्थितीत म्हात्रेंचे पद रद्द करण्यासाठी सर्व स्तरातून दबाव वाढत आहे.

रमेश म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारी अर्जात सत्यप्रतिज्ञा पत्राच्या माध्यमातून आपण अनधिकृत बांधकाम केलेले नाही. आपल्या रक्ताच्या नात्यामधील कोणीही अनधिकृत बांधकाम केले नसल्याचे म्हटले आहे. म्हात्रे यांनी दिलेली माहिती खोटी आहे. म्हात्रे यांचा मुलगा प्रवीण म्हात्रे याने जुनी डोंबिवली भागात सहकाऱ्यांच्या मदतीने बेकायदा इमारत उभारली आहे. या इमारतीच्या जमिनीचे बनावट कागदपत्र, सातबारा, फेरफार तयार करून त्यामध्ये त्या जमिनीशी कोणताही संबंध नसताना स्वत:चे नाव घुसवले आहे.

याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक टाळण्यासाठी प्रवीण फरार झाला आहे. मुलाच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणावरून रमेश म्हात्रेंचे नगरसेवक पद रद्द करा, अशी मागणी मागील सात महिन्यापूर्वी तक्रारदार कल्पेश जोशी यांनी कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त, नगरविकास प्रधान सचिव, कोकण विभागीय आयुक्त आणि राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. या यंत्रणांकडे पाठपुरावा करूनही आपल्या तक्रारीची गंभीर दखल घेतली जात नाही म्हणून जोशी यांनी मुंबईत आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

पद रद्द करण्याचे अधिकार पालिकेलाच

राज्य निवडणूक आयोगाने तक्रारदार जोशी यांना पत्र पाठवून नगरसेवक पद रद्द करण्याची कार्यवाही आयोगाकडून करण्यात येत नाही. हे सर्वाधिकार संबंधित पालिका आयुक्त, नगरविकास विभागाला आहेत, असे कळविले आहे. यासंदर्भात आयोगाने पालिकेला कळविले आहे. याबाबतच्या होणाऱ्या कार्यवाहीसाठी आपण नगरविकास विभागाशी संपर्क साधू शकता, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

दुसरे स्मरण पत्र

जानेवारीमध्ये तसेच गेल्या महिन्यात सत्यप्रतिज्ञा पत्राव्दारे नगरविकास विभाग, पालिका आयुक्तांना पत्र देऊनही त्यांनी म्हात्रेंचे नगरसेवक पद रद्द करण्याची कार्यवाही केली नाही. आपले सत्यप्रतिज्ञा पत्र खोटे असेल तर आपल्यावर कायद्यातील तरतुदीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार जोशी यांनी केली आहे. निवडणूक आयोगाने तक्रारदार जोशी यांना पालिका आयुक्तांना नगरसेवक पद रद्द करण्याचे अधिकार असल्याचे कळविल्यानंतर तक्रारदाराने पालिका आयुक्त गोयल यांना दुसरे स्मरणपत्र देऊन म्हात्रेंचे नगरसेवक पद रद्द करण्याबाबत सांगितले आहे.

निवडणूक आयोगाचे आलेले पत्र आणि कायद्यातील तरतुदींचा विचार करून रमेश म्हात्रे प्रकरणासंदर्भात कार्यवाही केली जाईल. – अभिनव गोयल आयुक्त.