Ramesh Mhatre Corporator Disqualification: कल्याण डोंबिवली पालिकेतील शिंदे गटाचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे याचे नगरसेवक पद अनर्ह (अपात्र) करण्यासाठीचे आपले पत्र कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्तांना पाठविण्यात आले आहे. यासंदर्भातच्या होणाऱ्या कार्यवाहीबाबत आपणास काही तक्रार असल्यास आपण शासनाच्या नगरविकास विकासाशी संपर्क साधावा. महापालिका सदस्यांना अनर्ह (अपात्र) करण्याची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगामार्फत करण्यात येत नाही, असे पत्र राज्य निवडणूक आयोगाकडून रमेश म्हात्रेचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसलेल्या तक्रारदार कल्पेश गंगाराम जोशी यांना दिले आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव प्रदीप परब यांनी यासंदर्भातच्या कार्यवाहीचे पत्र तक्रारदार जोशी यांच्यासह कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त, शासनाच्या मंत्रालयातील नगरविकास विभागाचे उपसचिव यांना पाठविले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम १० १(ड) नुसार पालिका सदस्यांना अनर्ह(अपात्र) ठरविण्याची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात येत नाही, असे राज्य निवडणूक आयोगाकडून तक्रारदार जोशी यांना स्पष्ट करण्यात आले आहे.

सात महिने पाठपुरावा

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कल्याण डोंबिवली पालिकेची निवडणूक पार पडली. उमेदवारी अर्ज भरताना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी कोपर प्रभागातून उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरताना आपण स्वत, आपल्या घरातील पत्नी, मुलगा किंवा अन्य कोणी अनधिकृत बांधकाम केले आहे का, अशी माहिती सत्यप्रतित्रापत्राद्वारे उमेदवारी अर्जात भरायची होती. ही माहिती भरताना रमेश म्हात्रे यांनी आपला अनधिकृत बांधकामाशी कोणताही संबंध नाही आणि रक्ताच्या नात्यामधील कोणीही अनधिकृत बांधकाम केले नसल्याचे उमेदवारी अर्ज भरताना राज्य निवडणूक आयोगाला दाखल केलेल्या सत्यप्रतित्रापत्रात म्हटले आहे, असे तक्रारदार जोशी यांनी सांगितले.

म्हात्रे यांनी सत्यप्रतिज्ञापत्रात आपला अनधिकृत बांधकामाशी संबंध नसल्याचे म्हटले असले तरी, रमेश म्हात्रे याचा मुलगा प्रवीण रमेश म्हात्रे याने जुनी डोंबिवली भागात बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन, शासकीय बनावट स्वाक्षरी शिक्क्यांचा वापर करून, जमीन मालकीशी स्वताचा दुरान्वये संबंध नसताना त्या जमिनीच्या सात बारा उताऱ्यावर स्वताचे नाव चढवून आरोही हाईट्स नावाची बेकायदा इमारत आपल्या साथीदारांच्या मदतीने उभारली आहे. या जमीन व्यवहार, सदनिका विक्री आणि बांधकामाचे दस्त नोंदणी अधिकाऱ्यांची दिशाभूल करून करण्यात आली आहे, असे तक्रारदाराने म्हटले आहे.

याप्रकरणाची महसूल विभागाने चौकशी केल्यानंतर महसूल विभागाने संबंधित सात बारा उतारे हे महसूल विभागाने दिले नसल्याचे स्पष्ट करून ते बनावट असल्याचे म्हटले आहे. या बनावट सात बारा उताराप्रकरणी डोंबिवली विभागाचे मंडळ अधिकारी रवींद्र जमदरे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात मागील वर्षी प्राथमिक तपासणी अहवाल (एफआयआर) दाखल केला आहे, असे तक्रारदार जोशी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

यासंदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पासून रमेश म्हात्रेचा मुलगा प्रवीण फरार आहे. त्याच्या अटकेसाठी आपण पोलिसांकडे पाठपुरावा करत आहोत. महिनाभरात याप्रकरणाची चौकशी करून कार्यवाहीचे आश्वासन साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी आपणास दिले आहे. सात महिन्यापासून आपण निवडणूक आयोगासह नगरविकास विभाग, कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त यांना पत्रे पाठवून म्हात्रेचे नगरसेवक पद रद्द (अपात्र) करण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. परंतु, राजकीय दबावामुळे ही कार्यवाही होत नसल्याने आणि शासन यंत्रणा आपल्या पत्राची दखल घेत नाही म्हणून आपण या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी आपण बेमुदत उपोषण सुरू होते, असे जोशी यांनी सांगितले.

यासंदर्भातील प्राप्त तक्रार काय आहे. निवडणूक आयोगाचे पत्र काय आशयाचे आहे. हे तपासून नगरसेवक अनर्ह करण्याच्या कायद्यातील तरतुदीचा विचार करून यासंदर्भातची कार्यवाही आणि सर्व बाबी तपासून उचित निर्णय घेतला जाईल.-अभिनव गोयल आयुक्त, कडोंमपा.