कल्याण – कल्याण डोंबिवली शहरे कचरामुक्त करण्याचा ध्यास घेणारे आणि कल्याण डोंबिवली पालिकेला कचरा मुक्त शहर म्हणून उच्च मानांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेले, समर्पित भावाने काम करणारे कल्याण डोंबिवली पालिकेचे घनकचरा उपायुक्त रामदास कोकरे यांची शासनाने तडकाफडकी बदली केली. या अचानकच्या बदलीने नागरिक, नगरसेवक, शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने उपायुक्त कोकरे यांची बदली तातडीने रद्द करावी आणि त्यांना आहे त्या पदावर पुन्हा स्थानापन्न करावे, अशी नागरिकांनी आग्रहाची मागणी आहे.

शहर स्वच्छता आणि कचरा, प्लास्टिक मुक्तीचा कित्ता (पॅटर्न) घेऊन शासकीय सेवेत सक्रिय असलेल्या उपायुक्त कोकरे यांनी राज्यातील वेंगुर्ला, कर्जत, माथेरान, दापोली नगरपालिकांमध्ये शहर स्वच्छतेचे उपक्रम यशस्वीपणे राबवून पथदर्शी प्रकल्प निर्माण केले. उकिरडा म्हणून नेहमीच राजकीय मंडळी आणि विविध स्तरातून हिणवली गेलेली आणि कधीच कचरा मुक्त होणार नाही, अशी कल्याण डोंबिवलीची ख्याती होती.

कोकरे आले चित्र बदलले

मागील पाच वर्षापूर्वी उपायुक्त रामदास कोकरे यांची शासनाने कल्याण डोंबिवली पालिकेत बदली केली. करोना महासाथीची परिस्थिती असताना कोकरे यांनी या अवघडल्या परिस्थितीत घनकचरा विभागातील अधिकारी, कामगारांचे मनोबल उचांवून शहर स्वच्छतेसाठी पालिकेची यंत्रणा कामाला लावली. पालिका मुख्यालयातील वातानुकूलित दालनात बसण्यापेक्षा शहर स्वच्छ, कचरा मुक्त होणे आवश्यक असल्याने कोकरे पहाटे साडे चार ते रात्री १२ वाजेपर्यंत शहराच्या विविध भागात पायाला भिंगरी बांधून फिरत होते.

सोसायट्या, बाजारपेठा, व्यापारी, नागरिकांमध्ये मिसळून शहर स्वच्छता ही कशी पालिकेबरोबर आपली जबाबदारी आहे, कचरा हे कसे सोने आहे हे कोकरे यांनी नागरिकांना पटवून दिले. या हालचालींमुळे कल्याण, डोंबिवली शहरे कचरामुक्त होऊ शकतात, असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करण्यात कोकरे यशस्वी झाले. शहरातील ४०० हून अधिक कचराकुंड्या उचलून नागरिकांना पालिकेने निर्माण केलेल्या यंत्रणेद्वारे कचरा पालिकेच्या ताब्यात द्यावा. रस्ते, चौक, मोकळ्या जागांमध्ये कचरा टाकू नये, असा विश्वास निर्माण केला.

दांड्या गायब

सकाळी हजेरी निवाऱ्यावर स्वाक्षरी करून झाडू न मारताच सोसायट्यांंमधील कचरा उचलण्यासाठी निघून जाणारे सफाई कामगार पती, पत्नी उपायुक्त कोकरे यांच्या धाकामुळे दिवसभर शिस्तीत रस्ते सफाईची कामे करू लागले. पालिकेच्या कचरावाहून गाड्या दिवस, रात्र रस्त्यावर धाऊ लागल्या. ओला, सुका कचरा वेगळा करून देणे, घरातील विविध प्रकारचा ११ प्रकारचा कचरा वर्गीकृत करून त्या माध्यमातून पालिकेला लाखो रूपयांचा महसूल कोकरे यांनी पालिकेला मिळवून दिला. अनेक बेरोजगारांना या माध्यमातून कामे मिळवून दिली. या सततच्या उपक्रमांमुळे मागील चार ते पाच वर्षात कल्याण डोंबिवली शहरे कचरा मुक्तीचा मोकळा श्वास घेऊ लागली.

कोकरे यांची बदली

हे उपक्रम यशस्वी झाल्यावर दोन वर्षापू्र्वी कोकरे यांची बदली झाली. त्यानंतर कल्याण, डोंबिवली शहरात त्यांनी बसवलेली शहर स्वच्छतेची घडी विस्कटली. जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसू लागले. नागरिक हैराण झाले. खासगीकरणातून पालिकेने काही प्रभागांमध्ये प्रभावीपणे स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.

शहरातील काही भागातील नागरिक कचऱ्याने हैराण असताना, कोकरे यांची पुन्हा गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कल्याण डोंबिवली पालिकेत बदली झाली. नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

घनकचरा विभागातील यंत्रणा पुन्हा आता रेटून काम करावे लागेल म्हणून अस्वस्थ झाली. कोकरे यांनी पुन्हा नव्या दमाने काम सुरू करून शहर स्वच्छेता उपक्रम हाती घेतला. ही दोन्ही शहरे कचरामुक्तीकडे वाटचाल करत असतानाच पुन्हा माशी शिंकली आणि शासनाने कोकरे यांची त्यांना कोठेही नेमणूक न देता तडकाफडकी बदली केली. यामध्ये मोठी राजकारणाची ‘खिचड“ शिजली असल्याची चर्चा आहे.

शहर स्वच्छ, कचरा मुक्त करण्याचा उपायुक्त कोकरे यांच्याकडे एक पॅटर्न आहे. कल्याण, डोंबिवली शहरे कचरामुक्त करण्यात कोकरे यांचा मोलाचा वाटा आहे. शासन त्यांची बदली करून काय साध्य करत आहे. – कृष्णा जोशी रहिवासी.

समर्पित भावाने काम करणारा नगरसेवक, पालिका प्रभाग अधिकारी यांची कचराविषयक डोकेदुखी कमी करणारा अधिकारी म्हणून कोकरे यांची ओळख आहे. कल्याण, डोंबिवली शहरे कचरामुक्त होईपर्यंत शासनाने त्यांची पालिकेतील पदस्थापना कायम ठेवावी. – राजू नलावडे रहिवासी.