कल्याण: डाॅक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना पहिले अटक करा, ही पालिका, खासगी रुग्णालयातील डाॅक्टरांची मागणी पूर्ण झाल्याने गुरूवारी कल्याण, डोंबिवलीतील पालिकेची, खासगी रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली. अनुचित प्रकार टाळण्यासाठी शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई रुग्णालयांच्या प्रवेशव्दारांवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डाॅ. सृष्टी बाविस्कर, वैद्यकीय अधिकारी डाॅ. वैभव साळुंके यांच्यासह दोन परिचारिकांना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मारहाण केल्यानंतर पालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून म्हात्रेंच्या अटकेच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन सुरू केले होते. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या खासगी डाॅक्टरांनी कल्याणमधील रुग्णालये, दवाखने बंद ठेऊन या घटनेचा निषेध आणि अटकेची मागणी केली होती. डोंबिवली बंद करण्याची तयारी सुरू असताना बुधवारी संध्याकाळी म्हात्रे यांना अटक झाली.
या अटक प्रक्रियेनंतर पालिका रुग्णालयाच्या डाॅक्टरांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ल यांच्या नेतृत्वाखाली वसंत व्हॅली रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. सपना रामोळे, शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. सादिया पिंजारी, वैद्यकीय अधिकारी यांनी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली. या बैठकीत पालिका सुरक्षा रक्षकांसह अतिरिक्त पोलीस बळ पालिकेच्या शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई आणि वसंत व्हॅली रुग्णालयाला पुरविण्यात येईल. या रुग्णालयांमध्ये कायमस्वरूपी पोलीस चौकीची उभारणी करण्यात येऊन याठिकाणी तिन्ही पाळ्यांमध्ये पोलीस उपस्थित राहतील अशी व्यवस्था उभारण्यात येईल.
पालिका रुग्णालयात येणाऱ्या अभ्यगंतांना प्रवेश पास देण्याची सुविधा सुरू करण्यात येईल. रुग्णालयात रुग्ण, नातेवाईकांच्या समुपदेशनासाठी समुपदेशक नियुक्त केले जातील. रुग्णालयात पुरेशा प्रमाणात डाॅक्टर, परिचारिक, इतर कर्मचारी उपलब्ध राहण्यासाठी नोकर भरतीची प्रक्रिया करण्यात येईल. पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये पुरेसे सुरक्षा रक्षक तैनात असतील अशी व्यवस्था उभारण्यात येईल, अशी आश्वासने आयुक्त अभिनव गोयल यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली. सुरू असलेले काम बंद आंदोलन मागे घेण्यास सांगितले.
आयुक्तांनी दिलेली आश्वासने मान्य असल्याने गुूरूवारपासून पालिका रुग्णालयांतील कामबंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी आपली रुग्णालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. तसेच, म्हात्रे यांच्यावर पुढील कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत समन्वयात राहण्याचे ठरविण्यात आले.
संस्थात्मक तक्रार करा
शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टर हे पालिकेचे डाॅक्टर होते. कर्तव्यावर असताना या डाॅक्टर, परिचारिकांना मारहाण झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने स्वतंत्र संस्थात्मक तक्रार करून या मारहाण प्रकरणी प्राथमिक तपासणी अहवाल पोलीस ठाण्यात नोंदवून घेण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे अनेक खासगी डाॅक्टरांनी सांगितले. यासाठी आयुक्त अभिनव गोयल, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ला यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे खासगी डाॅक्टरांनी सांगितले. तसेच, पालिकेने हा दावा चालविण्यासाठी पीडित डाॅक्टरांना गुन्हे क्षेत्रातील ज्येष्ठ वकील देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच, महिला डाॅक्टरने नगरसेवक म्हात्रे यांच्या विरूध्द ॲट्राॅसिटीचा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची मागणी पुढे येत आहे.
फास्ट ट्रॅक कोर्ट
नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डाॅक्टरांना मारहाण करताचे दृ्श्यध्वनी चित्रण पुढे आले आहे. याप्रकरणात भक्कम साक्षीदार आहेत. त्यामुळे याप्रकरणाचा तपास लवकर करून पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल करावे. हा दावा जलदगती न्यायालयात चालवून याप्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल यासाठी पालिका, वैद्यकीय संघटनांनी, जाणते नागरिकांनी यांनी पाठपुरावा करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
