कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीत विजयी उमेदवारांकडे पाहिल्यानंतर मतदारांनी निरपेक्ष भावनेने विकास कामे करणारे हरहुन्नरी सामाजिक कार्यकर्ते, डाॅक्टर, वकील असे सुशिक्षित चेहरे यांना प्रथम प्राधान्य दिले असल्याचे निकाल चित्रावरून स्पष्ट दिसत आहे. मागील १५ ते २० वर्ष पालिकेत ठाण मांडून असलेल्या काही जुन्या जाणत्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना मतदारांनी कोणत्याही दबावाला न झुकता घरी बसविण्यास मागे पुढे पाहिले नाही. तर काहींनी प्रभागातील आपली ताकद अद्याप टिकून ठेवली असल्याने असे जुने जाणते विजयी झाले आहेत.
डोंबिवली पश्चिमेत मागील वीस वर्षापासून सामाजिक भावनेतून काम करणारे अध्यात्मिक क्षेत्रातील ज्ञानेश्वरीचे अभ्यासक प्रल्हाद म्हात्रे यांचा अनपेक्षितपणे विजय झाला आहे. ठाकरे गट आणि मनसेची युती असली तरी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कल्याण, डोंबिवली शहरांकडे जाहीर सभा घेऊन किंवा अन्य काही कारणाने आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी फार मेहनत घेतली नाही. पण, या पक्षांच्या माध्यमातून कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढविणाऱ्या तळमळीच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वी आपण आपल्या प्रभागात नागरी समस्या सोडविण्यासाठी केलेले काम. करोना महासाथीच्या काळात लोकांनी केलेली मदत या सर्व ताकदीचा विचारपूर्वक वापर करून पालिका निवडणुकीत बाजी मारण्यात यश मिळविले आहे.
डोंबिवली पश्चिमेत भागशाळा मैदानात मातीच्या सुगंधाचे अस्तित्व टिकून ठेवण्यात, तेथील खेळाडु, ज्येष्ठ नागरिक, वृध्द, बालगोपाळांसाठी लागणाऱ्या सुविधांसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद म्हात्रे यांनी कल्याण डोंबिवली पालिकेची कोणत्याही प्रकारची मदत घेतली नाही. स्वखर्चातून या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. गुन्हेगारांचा अड्डा म्हणून ओळखला जाणारा ठाकुर्ली उड्डाण पूल, बावनचाळ परिसर हा रेल्वे मैदानाचा परिसर गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत प्रल्हाद म्हात्रे यांनी विविध प्रशासकीय, स्थानिकांच्या आव्हानाला तोंड देत विकसित केला आहे.
शिक्षण, आरोग्य, अनेक सामाजिक कामात प्रल्हाद म्हात्रे नेहमीच आघाडीवर असतात. मधल्या काळात मनसेकडून त्यांनी फारकतही घेतली होती. पालिका निवडणुकीच्या तोंडावर म्हात्रे यांना पक्षाने आर्जव केल्याने त्यांनी मनसेकडून उमेदवारी घेतली. केलेला विकास नागरिकांसमोर असल्याने तळमळीचे कार्यकर्ते प्रल्हाद म्हात्रे निवडून आले.
डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा भागात पूर्वीचे शिवसेना शिंदे गटाचे पण पालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळालेले मनसेतून निवडणूक लढविलेले संदेश पाटील यांनी गेल्या पाच वर्षापासून नगरसेवक होण्यासाठी जोरदार तयारी केली होती. करोना महासाथीच्या काळात त्यांनी नागरिकांना किराणा सामानापासून ते नागरी समस्या सोडविण्यापर्यंत विविध प्रकारची मदत केली. त्याची पावती नागरिकांनी त्यांना पालिका निवडणुकीच्या माध्यमातून दिली. कल्याण पूर्वेत खडेगोळवली भागात ठाकरे गटाचे मधुर म्हात्रे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विक्रम तरे यांना पराभूत करून विजयी झाले आहेत. मधुर म्हात्रे यांनी खडेगोळवली भागात नागरी समस्या सोडविण्यावर भर दिला होता.
डोंबिवलीत गणेशनगर भागात भाजपच्या ॲड. रविना म्हात्रे, गांधीनगर, नांदिवली भागात ॲड. कविता म्हात्रे अशा नवोदित नवख्या चेहऱ्यांना नागरिकांनी शहर विकासाचा विचार करून मतदान केले आहे. मागील वीस ते पंचविस वर्षापासून पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येणारे नगरसेवक आपली प्रभागातील विकास कामे, जुने संबंध या नात्यामधून विजयापर्यंत मजल मारली आहे.
