कल्याण : कर्जत, कसारा, खोपोलीकडून सकाळच्या वेळेत मुंबईला जाणाऱ्या लोकल या अतिजलद आहेत. या लोकल मुंबईत कार्यालयीन वेळेच्या आधी अर्धा ते एक तास पोहचत असल्याने कसारा, कर्जत ते कल्याण, डोंबिवली, ठाणे पर्यंतच्या बहुतांशी नोकरदार प्रवाशांची या अतिजलद लोकलना पसंती असते. या लोकल प्रवाशांनी टिटवाळा, उल्हासनगरपर्यंत खचाखच भरतात.

दूरवरून आलेल्या प्रवाशांना कल्याण, डोंबिवली ते ठाणे दरम्यान उतरण्यास जागा मिळत नाही, मग हे प्रवासी अगोदरच येऊन दरवाजात लटकत राहतात आणि जीव गमावतात, अशी माहिती रेल्वे प्रवासी संघटना आणि काही जाणत्या प्रवाशांनी दिली.

कसारा, कर्जत, खोपोली भागातून अनेक दुध, भाजीपाला विक्रेते सकाळच्या वेळेत कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई दिशेने निघात. या लोकल अतिजलद असल्याने नोकरदार वर्गाची या लोकलना सर्वाधिक पसंती असते. दूरवरून प्रवास करून आलेले प्रवासी उल्हासनगर, शहाड, कल्याण, डोंबिवली, ठाणे रेल्वे स्थानकात उतरण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी त्यांना उतरण्यास जागा मिळत नाही.

कसारा, कर्जत, खोपोलीकडून येणारे हे प्रवासी कल्याण, डोंंबिवली, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, ठाणे रेल्वे स्थानकात उतरायचे असेल तर अगोदरच फलाट दिशेकडील दरवाजाजवळ येऊन थांबतात तर काही अशक्त प्रवासी फलाटावरील गर्दीमुळे उतरण्याची हिम्मत नसल्याने फलाटाच्या विरुध्द बाजुकडील दरवाजात जाऊन रेल्वे मार्गिकेतून उतरण्याचा प्रयत्न करतात. या रेटारेटीत काही प्रवासी विरुध्द बाजुने उतरताना रेल्वे मार्गात पडून जीव गमावतात. कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यानचे नियमितचे अपघात याच प्रकारातील आहेत, असे कसारा, कर्जत लोकलने प्रवास करणारे नियमितचे प्रवासी सांगतात.

त्यामुळे लोकल कसारा, कर्जत असली तरी या लोकलने दूरवरून प्रवास करणारे प्रवासी डोंबिवली, कल्याण, ठाणे रेल्वे स्थानकात उतरताना मात्र ‘बेवारस’ असतात. या रेल्वे स्थानकांवरील गर्दीमुळे या रेल्वे स्थानकात आपण सुरक्षित उतरू की नाही याची कोणतीही खात्री या रेल्वे प्रवाशांना नसते. कसारा, कर्जत, खोपोली लोकलने सकाळच्या वेळेत मुंबई दिशेने जाणारे प्रवासी थेट मुंबईत जाणारे असले तर ते सुरक्षित प्रवास करतात. याच प्रवाशांना कल्याण, डोंबिवली, ठाणे रेल्वे स्थानकांवर उतरायचे असेल तर त्यांना जीव धोक्यात घालूनच उतरावे लागते, असे कसारा, कर्जत भागातून दुध, भाजीपाला घेऊन येणारे विक्रेते सांगतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच अतिजलद लोकलने कल्याण, डोंबिवली भागातून लोंबकळत, लटकत प्रवास करणारा प्रवासी गर्दीतून सुखरूप डब्यात पोहचता येईल यासाठी खटपट करत असतो. डोंबिवली ते मुंब्रा दिशेने अतिजलद लोकलने वेग घेतला की लोंबकळत असलेले प्रवासी डब्यातील रेट्यामुळे घायकुतीला येतात. प्रत्येक प्रवासी श्वास घेण्यापुरता डब्यात उभा असतो. त्यामुळे लोकल दरवाजात लोंबकळत, लटकत असलेल्या प्रवाशांच्या अवस्थेचे त्याला काही कळत नाही. अशातच लोकल वळण मार्गावर हेलकावे खाऊ लागली की दरवाजातील प्रवासी तोल जाऊन रेल्वे मार्गात पडतो. तो जखमी होतो किंवा मृत्यू पावतो, असे रेल्वे प्रवाशांनी सांगितले.