कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ऑनलाइन माध्यमातून एक खिडकी योजनेतून उत्सव साजरा करण्याची परवानगी देण्यात यावी. ज्या गणेशोत्सव मंडळांना ऑनलाइन अर्ज सादर करण्यात अडचण येत असेल तर त्यांचा प्रत्यक्ष परवानगी अर्ज दाखल करून घेऊन प्रभागस्तरावर त्या मंडळांना परवानगी देण्याची प्रक्रिया साहाय्यक आयुक्तांनी पार पाडावी. यासाठी प्रभाग स्तरावर स्वतंत्र खिडकीची योजना सुरू करावी. तसेच, यावर्षीही मंडळांकडून मंडप शुल्क आकारणी करू नये, असे निर्देश कल्याण-डोंबिवली पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी दिले आहेत.
एक खिडकी योजनेची कामे प्रभावी व गतिमानतेने होण्यासाठी या या खिडकीच्या ठिकाणी कार्यरत पालिका, महावितरण, अग्निशमन, महावितरण, पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी संबंधित प्रशासनाने तातडीने प्रशिक्षणे द्यावीत, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. मागील वर्षीच्या धोरणाप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव मंडळांकडून मंडप शुल्क आकारण्यात येऊ नये, अशा सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
गणेशोत्सव शांततामय वातावरणात पार पडण्यासाठी पालिका साहाय्यक आयुक्तांनी प्रभागस्तरावरील नगरसेवक, स्वयंसेवी, सामाजिक संस्था, अशासकीय संस्थांच्या कार्यकर्त्यांबरोबर बैठका घ्याव्यात. गणपती विसर्जनस्थळी आवश्यक विद्युत रोषणाई, विसर्जनानंतर तेथील साफसफाई करण्यासाठी सफाई कामगारांना घनकचरा विभागाने तैनात करावे. गणपती विसर्जन मार्ग व गणेशोत्सव मंडळे, गणेशघाट भागात नियमित सखोल स्वच्छता झाली पाहिजे, अशा सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.
खड्डे तात्काळ बुजवा
१० सप्टेंबरपूर्वी पालिका हद्दीतील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे ठेकेदारांनी पूर्ण केली पाहिजेत. यासाठी शहर अभियंता, स्थानिक कार्यकारी अभियंता यांनी शहराच्या भागात पाहणी करून खड्डे सुस्थितीत भरले आहेत की नाही, याची पाहणी करावी. गणेशोत्सपूर्वी एकाही रस्त्यावर खड्डा दिसणार नाही, याचे नियोजन बांधकाम विभागाने करावे. रस्ते दुरुस्ती ठेकेदारांचे संपर्क क्रमांक प्रभाग साहाय्यक आयुक्तांना देण्यात यावेत, अशा सूचना आयुक्तांनी शहर अभियंता विभागाला केल्या आहेत.
जीवरक्षक तुटवडा
गणपती विसर्जन घाटांवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी, आपत्कालीन परिस्थितीत जीवरक्षक तैनात असले पाहिजेत म्हणून पालिकेने दोन वेळा जीवरक्षक नियु्क्तीसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण केली होती. परंतु, त्या निविदेला ठेकेदार कंपनीकडून प्रतिसाद मिळाला नाही. विसर्जन स्थळी जीवरक्षक (गोताखोर) आवश्यक आहेत. त्यामुळे आणीबाणीच्या स्थितीचा विचार करून जीवरक्षक निविदेला प्रतिसाद मिळाला नाहीतर मागील वर्षीच्या निविदेला मुदतवाढ देऊन त्यांच्याकडून जीवरक्षकांची कामे करून घ्यावीत, असे आयुक्तांनी गोयल यांनी सुचवले.
मूर्ती विसर्जन
सहा फुटापर्यंतच्या गणेश मूर्तीचे पालिकेच्या कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक आहे. सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या गणपती मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांच्या ठिकाणी विसर्जन करावे. विसर्जन स्थळ परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती थेट विल्हेवाटीच्या ठिकाणी वा पालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रावर घेऊन जाव्यात अशी सूचना आयुक्तांनी केली आहे. गणपती विसर्जन आपल्या दारी ही मागील दोन वर्षापूर्वीची संकल्पना यावेळीही प्रभावीपणे राबविण्यात यावी, अशा सूचना आयुक्तांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना केल्या आहेत.
