कल्याण – गणेशोत्सव चार दिवसावर आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप परवानग्यांसाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या एक खिडकी योजनेत दहा दिवसापूर्वी ऑनलाईन अर्ज केले आहेत. गणेशोत्सव तोंडावर आला म्हणून मंडळांनी मंडप रस्त्यावर उभारले आहेत. या मंडपांना परवानगी मिळविण्यासाठी गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते दररोज पालिकेच्या प्रभाग कार्यालयांमध्ये परवानगी कधी मिळेल म्हणून हेलपाटे मारत आहेत. पण, आपली परवानगी अद्याप मंजूर झाली नसल्याची उत्तरे कर्मचाऱ्यांकडून मिळत असल्याने गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत.
गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एक खिडकी योजनेतून तात्काळ मंजुऱ्या द्या, असे आदेश आयुक्त अभिनव गोयल यांनी अधिकाऱ्यांना दहा दिवसापूर्वी दिले आहेत. प्रभाग स्तरावरील एक खिडकी योजनेतून या परवानग्या गणेशोत्सव मंडळांना देण्यात येत आहेत. रस्त्यावर गणपतीचा मंडप उभारणीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाईन माध्यमातून पालिकेत अर्ज केला की मंडळांना एका खिडकीतून पालिका साहाय्यक आयुक्त, उपअभियंता, पोलीस, वाहतूक विभाग, महावितरण, अग्निशमन विभागाकडून ना हरकत दाखले देऊन मंडळांचे अर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या प्रभागस्तरावरून हे अर्ज तात्काळ मंजूर करून अग्निशमन, पोलीस, वाहतूक विभाग, महावितरण विभागाकडे पाठवले आहेत. पालिका, अग्निशमन विभाग वगळून पोलीस, वाहतूक आणि महावितरणकडून ना हरकत दाखले देण्यास विलंब होत असल्याने मंडळांचे अर्ज मंजूर होण्यास विलंब होत आहे. त्यातही महावितरणकडून मिळणारा प्रतिसाद एकदम थंड आहे. जोपर्यंत अर्जाला सर्व विभागांकडून मंजुऱ्या मिळत नाहीत तोपर्यंत तो अर्ज ऑनलाईन प्रक्रियेत प्रलंबित यादीत दिसतो. सर्व विभागांनी परवानगी देऊनही एका विभागाने परवानगी दिली नसेल तरी तो अर्ज प्रलंबित राहतो. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांचे अर्ज मंजूर होण्यास विलंब होत असल्याचे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले. गणेशोत्सव मंडळांनी रस्त्यावर मंडप उभारले आहेत. या मंडपांना पालिकेकडून अधिकृत मंजुरी येत नाही तोपर्यंत मंडपात वीज पुरवठा घेणे आणि इतर कामे करता येत नाहीत असे मंडळ कार्यकर्त्यांनी सांगितले.
गणेशोत्सव तीन दिवसावर आला तरी पालिकेकडून गणेशोत्सव मंडळांना परवानग्या मिळत नाहीत. झटपट काम मार्गी लावण्यासाठी एक खिडकी योजना राबवली जाते. ऑनलाईन अर्ज करूनही झटपट परवानग्या मिळत नसतील तर मग या योजनेचा उपयोग काय. – गजानन जोशी गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ता.
