कल्याण : मुसळधार पावसाच्या हाहाकारात सोमवारी टिटवाळ्या बल्याणी रस्त्याचा काही भाग खचला. तर कल्याण पूर्वेत कोळसेवाडी भागात चाळीतील एक घर कोसळुन एक महिला जखमी झाली. कल्याण, डोंबिवली शहरांच्या सखल भागात पाणी साचले असून काही ठिकाणी हे पाणी नागरी वस्तीत शिरले आहे. कल्याण, डोंबिवली खाडी किनारच्या अनेक भागात पाणी शिरल्याने अशा नागरिकांना पालिकेने संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले आहे.

उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने हे पाणी कल्याण शहर परिसरातील सखल भागात शिरले आहे. हे पाणी परिसरातील नागरी वस्तीत घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अशा पाणी तुंबणाऱ्या भागात पालिकेची आपत्कालीन पथके सक्रिय आहेत. आवश्यक ठिकाणी पाणी उपसा पंप बसविण्यात येत आहेत. आंबिवली, मोहने, धाकटे शहाड, गोविंदवाडी भागातील सखल भाग, कुंभारखाणपाडा, देवीचापाडा, कोपर, आयरे भागातील सखल भागातील नागरी वस्तीत पाणी शिरले आहे.

बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखला जाणाऱ्या टिटवाळा बल्याणी रस्त्याचा काही भाग सोमवारी सकाळी अचानक खचला. हा रस्ता खचला त्यावेळी या भागात नागरिक, वाहनांची वर्दळ नव्हती. अन्यथा मोठी दुर्घटना या भागात घडली असती. आपत्कालीन कामगारांनी तात्काळ या खड्ड्याभोवती संरक्षक कठडे उभे केले.

महिलांना मदत

टिटवाळ्यातील इंदिरानगर भागात पालांडे चाळीत राहणाऱ्या सखुबाई हिरे या वृध्द महिलेच्या घरात रविवारी पावसाचे पाणी शिरले. त्या आपल्या वृध्दत्वाकडे झुकलेल्या शरीराला सावरत घरातून पाणी उपसा करत होत्या. यासंदर्भातची माहिती समाज माध्यमांत प्रसारित होताच स्वच्छता निरीक्षक अक्षय कराळे यांनी हिरे आजींचे घर गाठले. त्यांच्या घरात येणारे पाणी बंद होईल यादृष्टीने हालचाली केल्या. तसेच आजींना आवश्यक खाद्य पदार्थांची पिशवी दिली. आजींना पालिकेच्या निवारा केंद्रात नेण्याचे नियोजन केले.

कल्याण पूर्व भागात कोळसेवाडी परिसरात चाळीतील एका घराचा छताचा भाग कोसळुन आशाबाई गांगुर्डे ही महिला जखमी झाली. ही माहिती मिळताच नगरसेवक महेश गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन जखमी आशाबाई यांना रुग्णालयात दाखल केले.

रहिवासी स्थलांतरित

डोंबिवली खाडी किनारी भागात पाण्याचा धोका असल्याने आणि सतत पाणी येऊ लागल्याने भर पावसात देवीचापाडा भागातील काही रहिवाशांनी आपल्या सामानासह इतर भागात आपले बस्तान हलवले. या भागात पाणी तुंबू नये म्हणून स्थानिक नगरसेवक संदेश पाटील, अनमोलनगरी भागात भाजप युवा जिल्हा उपाध्यक्ष अनमोल म्हात्रे जेसीबी, पाणी उपसा पंप आणून विशेष काळजी घेत आहेत.

शिळफाटा, मलंगगड भागात पाणी

शिळफाटा रस्त्याच्या सखल भागात, मलंगगड रस्त्यावर आज दुसऱ्या दिवशी पाणी तुंबले होते. त्यामुळे वाहन चालकांना संथगतीने वाहने चालवावी लागत होती. या संथगतीमुळे या रस्त्यावर काही ठिकाणी वाहन कोंडीचे दृश्य होते. नेवाळी नाका परिसरात पाणी तुंबले होते. मलंगगड भागातील ओहळ दुथडी वाहत आहेत.

एमआयडीसी जलमय

डोंबिवली एमआयडीसीतील खासदार बंगल्यात पाणी घुसू नये म्हणून एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांनी खासगी बंगले असलेल्या भागातील संरक्षक भिंतीना भगदाडे पाडली. त्यामुळे या भागातील नाले, रस्ते, गटारांमधील पाणी खासदारांच्या बंगल्याच्या सभोतीने परिसरातील बंगल्यांच्या आवारात, या भागातील शाळेच्या आवारात, काही बंगल्यांमध्ये शिरल्याने एमआयडीसीच्या या चुकीच्या कामाबद्दल रहिवाशांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.

दरवर्षी मुसळधार पाऊस सुरू झाला की नाल्याच्या तोंडावर असलेला खासदार बंगला पुराच्या पाण्याने वेढला जातो. डोंबिवली पूर्वेत सुयोग मंगल कार्यालयाजवळील गल्लीत एका सोसायटीच्या आवारातील जुनाट आंब्याचे झाड कोसळून या भागातील वाहनांचे नुकसान झाले. जीवित हानी झाली नाही. अशाच प्रकारे महाराष्ट्रनगरमध्ये एका बगीचामध्ये झाड कोसळले.

फोटो ओळ

टिटवाळा बल्याणी रस्त्याला भगदाड