कल्याण : मागील दोन दिवसांपासून कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागात मुसळधार पावसाचे पाणी साचत असल्याने नागरी वस्तीत घुसणारे हे पाणी रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने पालिका हद्दीत एकूण १५ पाणी उपसा पंपांच नियोजन केले आहे. या पाणी उपसासाठी पालिका आपत्कालीन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदाराचे एकूण ४० कामगार रात्रंदिवस काम करत आहेत.

दरवर्षी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत पावसाच्या पाण्याचे नियोजन करताना, एप्रिल, मे महिन्यात एकूण २२ पाणी उपसा पंपाचे नियोजन केले जात होते. निविदा पध्दतीने या कामाचे वाटप ठेकेदाराला करण्यात येत होते. यावेळी मे, जून महिन्याच्या कालावधीत स्थानिक प्राधिकार स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका पावसाळापूर्व कामांच्या नियोजनाला बसला. इतर महापालिकांप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिकेलाही त्याची झळ लागली.

आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने पाणी उपसा पंप निविदेचे नियोजन करण्यात आले. मे. गुप्ता एजन्सी या कामासाठी पात्र झाली. यापूर्वी या एजन्सीने कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत काम केले आहे. त्यामुळे ठेकेदाराने पाऊस सुरू होताच पालिका हद्दीत १५ पंपांचे नियोजन केले. प्रत्येक प्रभागाला भौगोलिक परिस्थितीप्रमाणे एक ते पाच अशा प्रमाणात हे पंप वाटप करण्यात आले आहे.

डोंबिवली पश्चिम ह प्रभाग हा खाडी किनारी आणि सखल भागात असल्याने या भागाच्या विविध भागात दरवर्षी पावसाचे पाणी घुसते. त्यामुळे या प्रभागासाठी एकूण ५ पंपांचे नियोजन केले आहे, असे आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. या पंपांची हाताळणी प्रभाग साहाय्यक आयुक्त आणि तेथील आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी योग्यरितीने ठेकेदाराच्या कामगारांच्या साहाय्याने करणे आवश्यक आहे.

अनेक वेळा थोडे पाणी साचले तरी साहाय्यक आयुक्त नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांच्या रेट्याला घाबरून घाईने उपसा पंपाची मागणी करतात. या उपसा पंपात काही तांत्रिक अडथळे आले तर पंप देण्यास उशीर होतो. काही समाजसेवक, नगरसेवक प्रशासनाला समाज माध्यमांतून नाहक लक्ष्य करतात, असे कामगारांनी सांगितले.

काटेकोर नालेसफाई

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत ज्या ठिकाणी नियमित पाणी साचते अशी शिवाजी चौक, वालधुनी परिसर, कल्याण पूर्वेतील परिसर, डोंबिवलीतील काही ठिकाणी निश्चित करून त्या ठिकाणी घनकचरा उपायुक्त रामदास कोकरे यांच्या उपस्थितीत प्राधान्याने नाले, गटारांची सफाई करून घेण्यात आली. त्या भागात यावेळी पाणी तुंबले नाही. अशाप्रकारे पाच ते सहा उपसा पंपांच्या जागा यावेळी कमी करण्यात आल्या आहेत. यापूर्वी पालिकेला २२ उपसा पंप लागत होते. मागील वर्षापासून पाणी तुंबणारी ठिकाणे निश्चित करून त्या भागातील नाले, गटारे, पाणी तुंबण्यातील अडथळे मे अखेरपर्यंत दूर करण्यात येऊ लागले. त्यामुळे काही ठिकाणी उपसा पंपांची गरज पडत नाही. अशी उपसा पंप लावण्याची चार ठिकाणे बंद करण्यात आली, असे आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडुनही खाडी किनारा भाग सोडला तर शहराच्या अंतर्गत भागात खूप पाणी तुंबल्याचे नागरी वस्तीला झळ बसल्याचे प्रकार मागील घटनांसारखे घडले नाहीत, असे अधिकारी म्हणाला. पाणी उपसा पंपासाठी ठाणे पालिका ५ कोटीची निविदा काढते, मुंबई महापालिका १४० कोटीची निविदा काढते. त्या तुलनेत कल्याण डोंबिवली पालिका ६२ लाखाची निविदा काढते. आपण नाले, गटार सफाईवर अधिक जोर देत असल्याने पाणी निचरा होण्याचे प्रमाण कल्याण, डोंबिवलीत वाढले आहे, असे अधिकारी म्हणाला. पाणी उपसा पंप सुस्थितीत असुन त्यांना दोन्ही बाजुने पाईप, ट्राॅली अशी व्यवस्था आहे, असे अधिकारी म्हणाला.