डोंबिवली : विविध व्याधी असलेला गरजू रुग्ण, सामान्य कुटुंबातील रुग्ण, अपघाती रुग्ण अशा विविध गटातील रुग्णांना वेळीच त्यांच्या मागणीप्रमाणे रक्त उपलब्ध व्हावे या विचारातून रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीच्या पदाधिकारी, सदस्यांनी बुधवारी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या रक्तदान उपक्रमात डोंबिवली शहर परिसरातील एकूण १८० नागरिक, रोटरीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी दिवसभरातील या उपक्रमात १०० रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले.

हे रक्त आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून गरजू रुग्णांसाठी रक्तपेढीच्या स्वाधीन करण्यात येणार आहे, असे रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीच्या अध्यक्षा रसिका मोडक यांनी सांगितले. रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीसह १४ रोटरी क्लब, २ रोट्रॅक्ट क्लब आणि शहरातील विविध सामाजिक, स्वयंसेवी आणि सहयोगी संस्थांचा सहभाग या रक्तदान शिबीरात होता, असे अध्यक्षा मोडक यांनी सांगितले.

या रक्तदान शिबीरात सहभागी प्रत्येक नागरिकाची आवश्यक वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर या नागरिकांना रक्तदानाच्या प्रक्रियेसाठी पुढे पाठविण्यात आले. यावेळी शरीरातील हिमोग्लोबीनची पातळी कमी असल्याने इच्छा असुनही ३१ रक्तदात्यांना रक्तदान करता आले नाही. रोटरीच्या अध्यक्षा रसिका मोडक यांनीही रक्तदान करून उपस्थित सर्व सदस्यांना रक्तदानासाठी प्रेरित केले.

मुसळधार पाऊस असुनही नागरिक, रोटरीचे सदस्य या उपक्रमात सहभागी होण्यासाठी दाखल होत होते. रक्तदान म्हणजे केवळ रक्त देणे नाही, तर एखाद्याला नवजीवन देण्याचा संकल्प आहे. त्यामुळे हा उपक्रम परिवर्तन वर्षाच्या पहिल्या दिवशी हाती घेतला, असे मोडक यांनी सांगितले.

वर्षभराच्या कालावधीत रक्तदान शिबीराप्रमाणे अनेक सामाजिक, पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. पाऊस सुरू झाल्याने वाढत्या उष्णतामानाचा विचार करून वृक्षारोपणाचे कार्यक्रम करण्याचे नियोजन आहे. अधिकाधिक रोपांची लागवड करून ती झाडे जगविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे काही शैक्षणिक उपक्रमांचेही नियोजन करण्यात येणार आहे. आदिवासी, दुर्गम, ग्रामीण भागात जाऊन काही सामाजिक उपक्रम राबविण्याचा विचार आहे, असे अध्यक्षा रसिका मोडक यांनी सांगितले.