कल्याण : शुक्रवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील सर्व मुख्य वर्दळीचे रस्ते जलमय झाल्याने या रस्त्यांना महानद्यांचे स्वरूप आले. शहरातील अंतर्गत रस्ते, चाळी, झोपड्यांच्या परिसरात, खाडी किनारच्या वस्तीत पावसाचे पाणी घुसल्याने नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली. कल्याण पूर्वेतील मलंग गड रस्ता, ठाकुर्ली चोळे ९० फुटी रस्ता, शिळ रस्ता जलमय झाल्याने वाहन चालकांना कसरत करत या रस्त्यांवरून वाहने चालवावी लागत आहेत.

रस्ते जलमय झाल्याने वाहने संथगतीने चालवली जात असल्याने या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. नाले, गटारांमधील पाणी रस्त्यांवर आल्याने रस्त्यांवरील पाण्यात कचरा, पाण्याच्या टाकाऊ बाटल्या यांचा खच साचला आहे. पालिकेच्या आपत्कालीन विभागाचे कामगार पाणी तुंबलेल्या भागातील पाण्याचा निचरा करण्याच्या कामात व्यस्त आहेत. संततधार मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील वाहन संख्या रोडावली आहे. शाळांना सुट्टी असल्याने रस्त्यांवरील शाळांच्या बसची वाहतूक पूर्ण ठप्प आहे. बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे. कोपरमध्ये एक झाड वाहनावर कोसळले.

मलंगगड रस्ता जलमय

कल्याण पूर्वेतील नेतिवली ते मलंगगड रस्ता जलमय झाला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा मागील १० वर्षात बेकायदा इमारतींची बांधकामे झाली. त्यामुळे भागातील नैसर्गिक प्रवाह बंद झाल्याने पावसाचे पाणी थेट मलंगगड रस्त्यावर येत आहे. आडिवली ढोकळी भागातील स्थानिक राजकीय मंडळी या सर्व प्रकाराला जबाबदार असल्याचे या भागातील रहिवासी सांगतात. बदलापूर, नेवाळीकडून येणारी आणि कल्याणकडून मलंगगडकडे जाणारी बहुतांशी वाहने मलंगगड रस्त्यावरील पाण्याने पर्यायीने मार्गाने नेण्यात येत आहेत. एक ते दीड फूट पाणी या रस्त्यावर तुंबले आहे. या भागातील चाळी, दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसले आहे. पूर्वेतील चिंचपाडा, कोळसेवाडी, काटेमानिवली भागातील सखल भागात पाणी तुंबले आहे.

टिटवाळा परिसर जलमय

टिटवाळा मांडा भागात बेसुमार बेकायदा चाळींच्या कामासाठी भराव करण्यात आले आहेत. या भरावांमुळे आणि बेकायदा चाळींमुळे या भागातील पाणी वाहून जाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद झाल्याने हे पाणी टिटवाळा परिसरातील बनेली, बल्याणी, मांडा परिसरात तुंबून राहत आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी वाहून जाण्याच्या मार्गात भूमाफियांनी बेकायदा चाळी उभारल्या आहेत. काही ठिकाणी डोंगराचे पाणी थेट नागरिक वस्तीत येईल अशा पध्दतीने चाळींची उभारणी माफियांनी केली आहे. मोहने, आंबिवली, शहाड परिसरातील सखल भागात पाणी साचले आहे.

शिवाजी चौकात पाणी

कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौकात पाणी तुंबल्याने या वर्दळीच्या चौकातून वाहने संथगतीने नेण्यात येत होती. बेतुरकरपाडा, लालचौकी, खडकपाडा, बारावे परिसरातील सखल भागात पाणी तुंबल्याने या भागातील बैठ्या चाळींमध्ये पाणी शिरले होते. कुटुंबीय पाण्याचा उपसा करण्यासाठी कामाला लागल्याचे दृश्य अनेक भागात दिसत होते. पालिका विशेष कक्षातून पालिका अधिकारी शहरातील पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते.

९० फुटी रस्ता जलमय

पत्रीपूल ते कचोरे ठाकुर्ली चोळे ९० फुटी रस्त्याच्या उतार भागात पाणी साचल्याने या भागातून वाहने संथगतीने चालविली जात होती. त्यामुळे या रस्त्यावर सकाळी वाहन कोंडी होती. ९० फुटी रस्त्याचा बहुतांशी भाग जलमय झाल्याने वाहन बंद पडण्याच्या भीतीने वाहन चालक शिळफाटा रस्त्याने टाटा पाॅवरमार्गे डोंबिवलीत येत होते. या रस्त्यावरील पाण्याचा निचरा करून घेण्यासाठी नगरसेविका रेखा चौधरी आपत्कालीन पथकासह हजर होत्या. शिळफाटा रस्त्याच्या सखल भागात पाणी साचल्याने या रस्त्यावरील अनेक ठिकाणी विस्कळीत झाली आहे. शिळफाटा रस्ता आता वाहन कोंडीबरोबर नियमित जलमय होऊन लागल्याने प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.