Tukaram Mundhe FDA Action in Kalyan Dombivali: आता दुकानासमोर महाराष्ट्र शासन नामपट्टी लिहिलेले वाहन उभे राहिले की वाहनातून अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे उतरतात की काय अशी भीती वाटते. या भीतीने आम्ही हाॅटेल, स्वीट मार्ट दुकानात पनीर, मावा, नाशिवंत दुग्धजन्न पदार्थ ठेवत नाहीत, अशी माहिती कल्याण, डोंबिवलीतील हाॅटेल, ढाबा मालक, स्वीट मार्ट विक्रेते यांनी दिली.
अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव पदाचा पदभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यापासून अन्न, औषध, सौंदर्य प्रसाधनात भेसळ करून त्या वस्तू, पदार्थ विक्री करणाऱ्या भेसळधारी व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. राज्यात दररोज विविध भेसळयुक्त अड्डे, भटारखान्यांवर धाडी टाकून कोट्यवधी रूपये किमतीचा माल अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी जप्त करत आहेत. या कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सचिव मुंडे यांच्या आक्रमक कारवाईचा फटका बसण्याची भीती आहे.
पनीर, मावा गायब
कल्याण, डोंबिवलीत ५०० हून अधिक हाॅटेल, ढाबे आहेत. तेवढीच दुग्धजन्य पदार्थ विक्री करणारी स्वीट मार्टची दुकाने आहेत. मागील अनेक वर्ष कल्याण, डोंबिवलीतील हाॅटेल मालक, स्वीट मार्ट दुकानदार घाऊक पनीर उत्पादकांकडून नियमित पनीर खरेदी करत होते. घाऊक पध्दतीने नियमित मावा विक्रेत्यांकडून मावा खरेदी केला जात होता. या पनीरमध्ये, माव्यात काही भेसळ आहे का याची कोणतीही शहानिशा हाॅटेल चालक, स्वीट मार्ट मालक करत नव्हते. भेसळ असली तरी यापूर्वी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे जिल्हा, तालुका स्तरावरील अधिकारी शहरातील हाॅटेल, स्वीट मार्ट दुकानांमध्ये तपासणीचे निमित्त करून येत होते. आणि हाॅटेल चालक, स्वीट मार्ट दुकान चालकांकडून जंगी स्वागत स्वीकारून तपासणी न करताच निघून जात होते. दर महिन्याला एकदा साहेबांना स्नेहाची भेट दिली की साहेब पुन्हा महिनाभरात शहरात, दुकानात फिरकत नव्हते.
आता घाबरगुंडी
आता प्रधान सचिवपदी तुकाराम मुंडे आल्यापासून नियमित चहापानासाठी हाॅटेल, स्वीट मार्ट दुकानात फेऱ्या मारणारे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आपण आता त्यातले नाहीच आहोत, असे हाॅटेल मालक, स्वीट मार्ट दुकानादारांना दाखवून, आपली आपुलकीची नेहमीची ओळख न दाखविता हाॅटेल, दुकानांमधील जिन्नस वस्तुंची तपासणी करत आहेत. या तपासणीत पदार्थात काही त्रृटी दिसली, भेसळयुक्त संशयास्पद दिसले की थेट त्या हाॅटेल मालक, दुकानदारावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यामुळे एका पदार्थापायी अख्खा दुकानाची बदनामी, ६० ते ७० वर्ष केलेल्या व्यवसायावर बोळा फिरणार या भीतीने दुकानात, हाॅटेलमध्ये पनीर, मावा, दुग्धजन्नय पदार्थ तात्पुरते नसले तरी फरक पडत नाही, असा विचार करून हाॅटेल, स्वीट मार्ट मालक दुकानात पनीर, मावा ठेवत नसल्याची खात्रीलायक माहिती आहे. घाऊक विक्रेत्याने भेसळयुक्त तयार करून विक्री केला असेल तर त्या साखळीतील सर्व किरकोळ विक्रेते कारवाईच्या फेऱ्यात येणार आहेत.
पनीर नागरिकांचा आवडता पदार्थ आहे. हाॅटेलमध्ये आल्यावर अनेक ग्राहक पहिले पनीरांनी बनविलेल्या पदार्थांना पसंती देतात. आता नागरिकांना पनीर नाही म्हटले की त्यांचा हिरमोड होत आहे, असे काही हाॅटेल व्यावसायिकांनी सांगितले. या धडक कारवाईमुळे भेसळयुक्त पदार्थ बाजारात येणे बंद होणार आहे. त्यांचे आरोग्य सुदृढ होण्यास मदत होणार आहे, असेही काही व्यावसायिकांनी सांगितले.
ज्येष्ठ सेवानिवृत्त सनदी अधिकारी अरूण भाटिया, ज्येष्ठ सेवानिवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी आपल्या कार्यकाळात अन्न आणि औषध प्रशासन खात्यात धडाकेबाजपणे काम केले होते. त्याचा दणका भेसळुयक्त अनेक व्यापाऱ्यांना बसला होता. तशीच कारवाई आता अनेक वर्षानंतर तुकाराम मुंढे यांनी सुरू केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
