कल्याण – इमारत, घर दुरुस्ती कामाचा राडारोडा उघड्यावर टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा विभागाने घेतला आहे. कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील संबंधित बांधकामधारक, घर दुरुस्ती करणारे मालक यांना चाप बसावा तसेच शहर शून्य कचरा मुक्त आणि कचऱ्याचे वर्गीकरण, पुनर्वापर आणि योग्य विल्हेवाट योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी हा निर्णय घेतला आहे.

शहरात आतापर्यंत इमारत बांधकामाच्या ठिकाणी पडलेला राडारोडा मजूर, ठेकेदार सार्वजनिक रस्त्यावर रात्रीच्या वेळेत टाकून देत होता. यामुळे रस्त्यावरील गटाराचे प्रवाह अडवले जात होते. पावसाळ्यात उद्भवणारी समस्या याबाबत कोणतीही पर्वा न करता अनेक वर्ष हा राडारोडा रस्त्यावर टाकण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. नविन बांधकाम करण्यात येणाऱ्या ठिकाणी तसेच घराघरांमध्ये दुरुस्तीची होणारी कामे यातून निघणारा राडारोडा कामाचा ठेकेदार गोणींमध्ये भरून त्याच परिसरात टाकून पसार होत होता.

शहराच्या अनेक भागात असे राडारोड्याचे ढीग आढळून आले आहेत. मुसळधार पावसामुळे या राडारोड्यातील माती, लहान घटक वाहून रस्त्यावर येत असून पाणी तुंबण्याबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेत बाधा येत असल्याचे घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आता राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

नियमानुसार कारवाई

बांधकाम कचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार नवीन बांधकाम , दुरुस्ती वा पाडकाम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेने कचरा उघड्यावर न टाकता नियमानुसार सुरक्षितपणे गोळा करून संबंधित ठेकेदार, कामगाराने अधिकृत केंद्रापर्यंत पोहोचवणे बंधनकारक आहे. यासाठी येणारा खर्च व व्यवस्थापन त्यांनीच करावे, असे स्पष्ट निर्देश या नियमान्वये देण्यात आले आहेत. याचे मुख्य उद्दिष्ट कचऱ्याचे वर्गीकरण पुनर्वापर व योग्य विल्हेवाट हे आहे, असे उपायुक्त कोकरे यांनी सांगितले.

पाडकामाची माहिती संबंधितांना देणे आवश्यक

– एखाद्या गृहनिर्माण संस्थेच्या आवारात नवीन बांधकाम, दुरुस्ती किंवा तेथील पाडकामाची माहिती संबंधितांनी आपल्या प्रभागातील स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांना त्वरित कळवावी. जेणेकरून महापालिकेमार्फत त्यांना कचरा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करणे सोयीचे होईल.

– महापालिकेत याबाबत कल्पना न देता गृहनिर्माण संस्थेतील सदस्यांमार्फत नवीन बांधकाम, दुरुस्ती किंवा पाडकाम यादरम्यान निर्माण होणारा कचरा उघड्यावर टाकल्याचे आढळून आल्यास संबंधित सदस्यांवर आता बांधकाम आणि पाडकाम कचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या तरतुदीचे उल्लंघन केल्याबाबत पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ च्या कलम १५ अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल. अशा आशयाचे परिपत्रक देखील सर्व गृहनिर्माण संस्थांना पाठवण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली.