कल्याण : दिवाळीत दुकानदार, खासगी आस्थापना, विकासक आपल्या कार्यालय, दुकाने, गृहप्रकल्पांसमोरील झाडांवर विद्युत रोषणाई करून वृक्षांना हानी पोहोचवतात. अशाप्रकारे रोषणाई करणे कायद्याने गुन्हा आहे. न्यायालयाने अशा प्रकारच्या रोषणाईला प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली पालिकेने दिवाळीत झाडांवर विद्युत रोषणाई होऊ नये, यासाठी प्रभागवार विशेष कारवाई पथक तयार केले आहे. अशाप्रकारे वृक्षांना इजा पोहचवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिका उद्यान विभागाचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी दिली.
दिवाळी सणाच्या काळात आनंदाच्या भरात दुकानदार, खासगी आस्थापना, विकासक आपल्या गृहप्रकल्पांसमोरील झाडांवर विद्युत रोषणाई करतात. यामुळे झाडांवरील पक्षी आणि इतर जैवविविधतेच्या अधिवासाला धोका निर्माण होतो.
झाडांवरील या विद्युत रोषणाई आणि वृक्षप्रदूषितपणाची न्यायालयाने गंभीर दखल घेऊन आपल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेने रोषणाईमुळे होणारे वृक्षप्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या असून विशेष कारवाई पथके तयार केली आहेत, असे मुख्य उद्यान अधीक्षक जाधव यांनी सांगितले.
प्रभागात निरीक्षक
कल्याण, डोंबिवली शहरात कोणीही विद्युत रोषणाई करून वृक्षांना हानी पोहोचविण्याचा प्रयत्न केला तर अशा तक्रारी उद्यान विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर या तक्रारींचे प्रभागस्तरावर निराकरण करण्यासाठी दहा प्रभाग कार्यालयांत उद्यान निरीक्षक कार्यरत असतील. प्रभाग साहाय्यक आयुक्त व अतिक्रमण नियंत्रण पथकातील कामगारांनी, तसेच, विद्युत विभागातील तारतंत्रीने उद्यान निरीक्षकांना झाडांवर केलेली विद्युत रोषणाई तात्काळ काढून टाकण्यासाठी व आवश्यक कायदेशीर कारवाईसाठी सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहे, असे जाधव यांनी सांगितले.
या कारवाईत कोणाही आस्थापनाने अडथळा आणला तर त्यांच्यावर फौजदारी कारवाईची तरतूद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या काळात अशाप्रकारची कारवाई टाळण्यासाठी प्रत्येक आस्थापनाने आपल्या दुकान, आस्थापनेसमोरील वृक्षांवर विद्युत रोषणाई करू नये, असे आवाहन उद्यान विभागाने केले आहे.
आयुक्तांचे आवाहन
पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पालिका हद्दीतील विकासकांच्या ग्रुपवर विकासकांनी आपल्या गृहप्रकल्पांच्या ठिकाणी विद्युत रोषणाई करताना आजुबाजुच्या झाडांवर विद्युत रोषणाई करून वृक्षांना इजा पोहोचवली जाऊ नये, असे आवाहन केले आहे. त्यामुळे दिवाळी सणापूर्वीच पालिका प्रशासनाने वृक्षप्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.
पर्यावरणप्रेमींची तक्रार
शिळफाटा रस्त्यावरील गोळवली हद्दीतील रिजन्सी अनंतम गृहसंकुल आवारात रस्ता दुभाजकांमधील झाडांवर मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करून वृक्षप्रदूषित करण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशाचा हा भंग असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी डोंबिवलीतील पर्यावरणप्रेमी राजू नलावडे, वास्तुविशारद राजीव तायशेटे, डाॅ. सुनील पुणतांबेकर, रूपाली शाईवाले, विवेक पंडित, माधव जोशी, अविनाश कुबल, भालचंद्र म्हात्रे, डाॅ. प्रल्हाद देशपांडे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. डोंबिवली पूर्व शिवमंदिर रस्त्यावर एका खासगी आस्थापनाने विद्युत रोषणाईसाठी झाडांची तोडमोड केली असल्याची तक्रार एका निसर्गप्रेमीने केली आहे.
दिवाळी सणाच्या काळात अत्यानंदांच्या भरात कोणीही आस्थपनाने आपल्या लगतची, सार्वजनिक रस्त्यावरील झाडांवर विद्युत रोषणाई करू नये. अशाप्रकारे कोणी विद्युत रोषणाईचा प्रयत्न केल्यास ती पालिकेच्या उद्यान निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखालील पथकाकडून काढण्यात येईल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. –संजय जाधव, मुख्य उद्यान अधीक्षक. कडोंमपा.
