कल्याण – गेल्या आठवड्यात कल्याण डोंबिवली पालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण पथकाने बल्याणी, उंभार्णी, धर्मशील मैदान परिसरातील भूमाफियांच्या ५०० हून बेकायदा चाळी भुईसपाट केल्या. त्या अगोदर ८० चाळी तोडण्यात आल्या. या बेकायदा चाळी उभारणीसाठी अ प्रभागातील एका अधिकाऱ्याने आणि त्याच्या सहकाऱ्याने भूमाफियांकडून प्रत्येक चाळीमागे एकही चाळ, खोली तुटणार नाही या बोलीवर प्रती खोलीमागे २२ हजार रूपये घेतले होते. अशाप्रकारे कोट्यवधीचा दौलतजादा या अधिकाऱ्याने करूनही बेकायदा चाळी तुटल्या. यामुळे टिटवाळा, बल्याणी भागातील भूमाफिया आक्रमक झाले असून चाळींमागे घेतलेले पैसे परत करा अन्यथा.. असे इशारे माफिया संबंधित अधिकाऱ्याला देत असल्याने त्या अधिकाऱ्याची भंबेरी उडाली आहे.
टिटवाळा, बनेली, बल्याणी, उंभार्णी भागातील बेकायदा चाळींच्या उभारणीसाठी प्रत्येक चाळीमागे २२ हजार रूपये घेऊन अशाप्रकारे सुमारे दीड ते दोन कोटीचा दौलतजादा केला आणि या बेकायदा चाळी पालिका मुख्यालयातील वरिष्ठांनी विविध प्रभागातील तोडकाम पथकांसह येऊन तोडून टाकल्या. यामुळे अ प्रभागातील स्थानिक अधिकारी अडचणीत आला आहे. एकीकडे आपण भूमाफियांना टिटवाळा भागातील बेकायदा चाळी तुटणार नाहीत आणि आपण या भागात फिरकणार नाहीत, असे आश्वासन देऊनही या बेकायदा चाळी तुटल्याने टिटवाळा, बल्याणी, बनेली, उंभार्णी भागातील भूमाफिया कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.
माफिया संतप्त
हे भूमाफिया दररोज पालिकेच्या अ प्रभाग कार्यालयाच्या बाहेर समुहाने येऊन संबंधित अधिकाऱ्याला आम्हाला आमचे बेकायदा चाळींच्या रक्षणासाठी घेतलेले पैसे परत करा म्हणून तगादा लावून आहेत. हा अधिकारी या रेट्यामुळे अस्वस्थ झाला आहे. हा अधिकारी बेकायदा चाळी उभारणीपूर्वी भूमाफियांच्या संपर्कात होता. त्यांच्याकडून दौलतजादा मिळाल्यावर त्यांना चाळी तुटणार नाहीत, गाळे तुटणार नाहीत अशी समाधानाची आश्वासने देत होता. पण, तोच ‘चकरी’ ‘भोवळ’ येणारा अधिकारी आता भूमाफियांचे मोबाईल फोन उचलत नसल्याने माफिया संतापले आहेत. आमचे बेकायदा चाळींच्या माध्यमातून घेतलेले पैसे परत करा, अन्यथा आम्ही तुला सोडणार नाही, अशी आक्रमक भूमिका भूमाफियांनी घेतली असल्याचे समजते.
पैसे खर्च
संबंधित अधिकाऱ्याने बेकायदा चाळींच्या माध्यमातून मिळालेले सुमारे दीड ते दोन कोटी रूपयांचा दौलतजादा अंबरनाथ येथे मुलीच्या नावाने ४५ लाखाचा फ्लॅट खरेदी करणे, पत्नीसाठी सोन्याचे लाखोचे दागिने खरेदी करणे आणि वाडा तालुक्यातील आपल्या मूळ गावी पोहच केल्याची चर्चा टिटवाळा परिसरात सुरू आहे. काही दौलतजादा कल्याणमधील आपल्या समर्थक महिला, पुरूष आश्रयदात्यांना या अधिकाऱ्याने पोहच केल्याची चर्चा आहे. हा दौलतजादा वाढवून मिळावा म्हणून पालिकेतील एक मोठा पदाधिकारी संबंधित अधिकाऱ्याला प्रचंड छळत असल्याचीही चर्चा आहे.
नोकरी सोडणार
भूमाफियांचा रेटा आणि त्यात भूमाफियांकडून घेतलेले पैसे परत करणे खर्च झाल्याने परत करणे शक्य नसल्याने आणि आपण अडचणीत येण्यापूर्वीच हा नेहमीच चक्कर येण्याची सोंग घेणार अधिकारी आता पालिकेत स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज करत असल्याची चर्चा आहे. आम्ही दौलतजादा वसूल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ठाम भूमिका टिटवाळ्यातील भूमाफियांनी घेतली असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
जेसीबी कामगार
अ प्रभागात अतिक्रमण नियंत्रण विभागात राहून एका कामगाराने रोख रक्कम देऊन ४० लाखाचा जेसीबी खरेदी केला. या कामगाराने टिटवाळ्यात सर्वाधिक बेकायदा चाळी उभारणीत हातभार लावला. हा कामगारही माफियांच्या रडारवर आहे. हा कामगार आता अ प्रभागातून बदली होऊन क प्रभागात पळाला आहे.
