KDMC Mayor Bungalow: कल्याण डोंबिवली पालिकेच्या महापौरांसाठी अठरा वर्षापूर्वी कल्याण पश्चिमेतील आधारवाडी तुरूंग परिसरात प्रशस्त जागेत महापौर बंगला प्रशासनाकडून उभारण्यात आला. या बंगल्यासाठी तत्कालीन प्रशासनाने लाखो रूपये खर्च केले. पण, ही बंगल्याची जागा अन्य सुविधांसाठी राखीव असल्याची टीका झाली. त्यानंतर हा बंगला वादाच्या भोवऱ्यात अडकला. लाखो रूपये खर्च करून उभारलेला महापौर बंगला आता उकिरड्यावर पडझड झालेल्या अवस्थेत उभा आहे.
या बंगल्याची डागडुजी करून तो पुन्हा महापौरांना राहण्यासाठी निवास योग्य करावा म्हणून गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत एकाही महापौर किंवा आयुक्त यांना वाटले नाही. या सर्व प्रकाराने जनतेच्या पैशाची मात्र उधळपट्टी झाली आहे. माजी महापौर रमेश जाधव यांच्या कार्यकाळात या बंगल्याची उभारणी झाली. या कालावधीत काही दिवस महापौर या बंगल्यात राहण्यासही गेले होते. पण नंतर त्यांनी तात्काळ या बंगल्यातून मुक्काम हलविला होता. आता तेच माजी महापौर रमेश जाधव शिवसेना शिंदे गटातर्फे नगरसेवक म्हणून पालिकेत निवडून आले आहेत.
रानटी झुडपांत बंगला
त्यामुळे शिवसेना शिंदे गटाने मानाच्या पदासाठी राखीव असलेल्या महापौर बंगल्याच्या नुतनीकरण आणि तो निवास योग्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आता काही नगरसेवकांकडून जोर धरू लागली आहे. कल्याण डोंबिवली पालिकेचे महापौर हे आतापर्यंत कल्याण, डोंबिवलीतील मूळ निवासी आहेत. त्यामुळे आपले घर सोडून महापौर बंगल्यावर राहण्यास जाण्यासाठी आणि महापौर बंगल्याच्या सुस्थितीकरणासाठी कोणीही महापौरांनी पुढाकार घेतला नसल्याचे समजते.
महापौर बंगल्यासाठी यापूर्वीच लाखो रूपये खर्च झाले आहेत. या बंगल्याच्या चारही बाजुने रानटी झुडपे वाढली आहेत. बंगल्याच्या परिसरात गवत वाढले आहे. बंगल्याची बाहेर आणि आतून पडझड झाली आहे. कोणाही महापौराला त्या ठिकाणी राहण्यास जायचे नव्हते तर मग या बंगल्यासाठी लाखो रूपयांची उधळपट्टी करून तत्कालीन प्रशासनाने नक्की काय साध्य केले, अशी चर्चा आता सुरू आहे.
आरक्षित जागा
महापौर बंगला उभारलेली जागा ही उद्यान किंवा बगिच्यासाठी आरक्षित आहे. त्यामुळे त्याठिकाणी महापौर बंगला उभारू नये यासाठी कल्याणमधील काँग्रेसची चिकणघर भागातील एक अभ्यासू नगरसेविका पालिका आणि शासनस्तरावर प्रयत्न करत होत्या. आधारवाडी परिसरातील बंंगला उद्यानाची हक्काची जागा महापौर बंगल्यासाठी बाधित करून परिसरातील रहिवाशांची गैरसोय प्रशासन करत आहे, असा या नगरसेविकेचा आरोप होता.
महापौर सिंहासनावर… बंगला
कल्याण डोंबिवली पालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची मंगळवारी बिनविरोध निवड होत आहे. महापौरपदी शिवसेना शिंदे गटाच्या ॲड. हर्षाली चौधरी-थविल विराजमान होत आहेत. उपमहापौर पदी भाजपचे नगरसेवक राहुल दामले विराजमान होत आहेत. हे दोन्ही पदाधिकारी अभ्यासू आहेत. त्यामुळे त्यांनी पालिका प्रशासनाशी संपर्क साधून महापौरांची वास्तु सुस्थितीत आणि महापौरांना तेथे निवास करता येईल यादृष्टीने सुसज्ज करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी सर्व पक्षीय नगरसेवकांकडून करण्यात येत आहे. याविषयावर पालिकेतील एकही अधिकारी बोलण्यास तयार नाही. नव्याने निवडून आलेले नगरसेवक याविषयी निर्णय घेतील, असे अधिकारी सांगतात.

