कल्याण : आपण मानाच्या सर्वोच्चपदी बसलो आहोत हे लोकांना दाखवून देण्यासाठी प्रत्येकाला आपल्यातील वेगळेपण दाखवून देण्याची इच्छा असते. यासाठी विविध क्लृप्त्या निवडल्या जातात. मुंबई पालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी महापौर पदाची माळ गळ्यात पडताच, आपल्या शासकीय महापौर पदाच्या वाहनावर लाल दिवा लावून घेतला. पण वाद होताच त्यांनी तो काढून टाकला.

अशाच प्रकारे कल्याण डोंबिवली पालिकेच्या महापौरांनाही आपल्या शासकीय वाहनावर लाल निळा दिवा बसवून घेण्याचा मोह सल्लागारांमुळे आवरला नाही. लाल निळा दिवा महापौरांनी आपल्या वाहनावर बसविताच याविषयी समाज माध्यमांवर टीका सुरू होताच महापौरांनी तो दिवा तात्काळ काढून टाकला.

लाल दिवा कोणत्या वाहनावर असावा याविषयी शासनाची नियमावली आहे. त्यामुळे मंत्री, वरिष्ठ अधिकारी, मानाची पदे उपभोगणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवर मागील काही वर्षापासून वाहनावर लाल दिवा लावण्यास बंदी आल्यापासून लाल दिवा लावला जात नाही. तरीही काही पदाधिकारी, अधिकारी वाहन कोंडीतून आपली मुक्तता करून घेण्यासाठी आपल्या खास सल्लागारांच्या सूचनेवरून अशाप्रकारचे लाल निळे दिवे बसवून नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकले.

महापौरांना मोह

कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्तपदी असताना पदनिर्देशित एका आयुक्ताने आपल्या वाहनावर लाल दिवा लावून घेतला होता. पण माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर, कौस्तुभ गोखले यांनी याविषयी शासन, आरटीओ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यानंतर हा दिवा काढून टाकण्यात आला होता. एका पालिका पदाधिकाऱ्यानेही असे प्रयत्न केले होते. हे प्रयत्न आरटीओ अधिकाऱ्यांनी हाणून पाडले होते. शासन सेवेतील कल्याणमधील एका वादग्रस्त अधिकारी आपल्या वाहनावर लाल दिवा लावून फिरत असे. ते वाहनही आरटीओने जप्त केले होते.

आपण मानाच्या पदावर असलो तरी आपणास आपल्या शासकीय वाहनावर लाल दिवा बसविण्यास प्रतिबंध आहे याची जाणीव असुनही कल्याण डोंबिवली पालिकेच्या महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनाही आपल्या सल्लागारांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे लाल दिवा महापौर वाहनावर बसविण्याचा मोह आवरला नाही. अशाप्रकारे दिवे लावण्यास प्रतिबंध आहे असे असताना महापौरांनी हे धाडस केल्याने समाज माध्यमांत महापौर वाहनाच्या लाल दिव्याच्या प्रतिमा झळकल्या. नागरिकांकडून यावर टीका करण्यात आली. ही टीका सुरू होताच अखेर महापौर वाहनावरील लाल दिवा वाद निर्माण होण्यापूर्वीच हटविण्यात आला. महापौर कार्यालयातील अधिकाऱ्याने दोन दिवसापूर्वी संबंधित दिवा काढून टाकण्यात आला आहे, असे सांगितले.

अनेक वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी जागोजागी दिसणाऱ्या वाहन कोंडीतून मुक्त होण्यासाठी अशाप्रकारचे लाल दिवे बसून घेत असल्याची चर्चा आहे. लाल दिवा नसल्याने आपण मानाच्या पदावर असुनही सामान्य प्रवाशासारखे वाहनात अडकून पडावे लागते. नियंत्रक वाहतूक अधिकाऱ्यांना वाहनात कोण सर्वाेच्च पदाधिकारी आहे हे कळत नाही. त्यामुळे या पदावरील पदाधिकाऱ्यांचे काही सल्लागार अशाप्रकारच्या क्लृप्त्या देत असतात, असे समजते.